
फॅक्टरीत कामाला जाते सांगून घराबाहेर पडलेली ५० वर्षीय महिला बेपत्ता
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मंगरूळ येथील ५० वर्षीय महिला अमळनेर शहरातून ३० ऑगस्ट रोजी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्यांच्या मुलाने अमळनेर पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून महिलेचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, निंबा प्रभाकर पाटील व त्यांच्या पत्नी सरलाबाई निंबा पाटील (वय ५०) हे मंगरूळ येथे राहतात. त्यांचा मुलगा सुनील पाटील हा कामानिमित्त पुणे येथे वास्तव्यास आहे. सरलाबाई पाटील या अमळनेर शहरातील आर. के. पटेल फॅक्टरीत कामाला आहेत.
सुनील पाटील यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सरलाबाई पाटील या ३० ऑगस्ट रोजी फॅक्टरीत कामाला जाते असे सांगून घरातून निघाल्या. मात्र, त्या रात्रीपर्यंत घरी परतल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा फॅक्टरीत शोध घेतला असता त्या आर. के. पटेल यांच्या बंगल्यावर कामाला गेल्याचे सांगण्यात आले.
यानंतर आर. के. पटेल यांच्या बंगल्यावर चौकशी केली असता तेथे काम करणाऱ्या एका महिलेने सांगितले की, सरलाबाई पाटील या ३० ऑगस्ट रोजी दुपारी १२.४५ वाजता धरणगाव येथे भांडी घेण्यासाठी जायचे आहे, असे सांगून तेथून निघून गेल्या होत्या. यानंतर सरलाबाई पाटील यांचा अमळनेर तसेच धरणगाव शहरातील विविध भागांत शोध घेण्यात आला. मात्र, त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे सुनील पाटील यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात सरलाबाई पाटील हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून त्यांच्या बेपत्ता होण्याबाबत अधिक तपास करून शोध घेण्यात येत आहे.

Leave a Reply