
महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग व कृषी महासंघाच्या उपाध्यक्षपदासाठी अमळनेरचा सुपुत्र वेदांशू पाटील यांची उमेदवारी
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग व कृषी महासंघाच्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणूक प्रक्रियेत उत्तर महाराष्ट्र – २ विभागातून युवा उद्योजक वेदांशू पाटील यांनी उपाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमळनेरच्या सुपुत्र असलेल्या वेदांशू पाटील यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील उद्योग व व्यापारी क्षेत्रात विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
महासंघाचे माजी अध्यक्ष खुशालभाई पोतदार यांच्या उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महासंघातील अनेक ज्येष्ठ पदाधिकारी, उद्योजक व व्यापारी बांधव उपस्थित होते. गेल्या जवळपास नऊ वर्षांपासून महाराष्ट्र वाणिज्य, उद्योग व कृषी महासंघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असलेल्या वेदांशू पाटील यांनी उद्योग, ई-वाणिज्य, शासकीय कंत्राटे, बांधकाम तसेच नव्या पिढीच्या उद्योजकतेशी संबंधित क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही त्यांचे काम सुरू आहे. महासंघाच्या शंभर वर्षांच्या इतिहासात सर्वात तरुण प्रशासकीय मंडळ सदस्य म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, उपाध्यक्षपदी निवड झाल्यास ते महाराष्ट्रातील सर्वात तरुण उपाध्यक्ष ठरणार असल्याची चर्चा आहे. अध्यक्ष रविंद्र माणगावे, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, विश्वस्त मंडळ अध्यक्ष आशिष पेडणेकर तसेच वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली वेदांशू पाटील यांनी गेल्या काही वर्षांत महासंघाच्या संघटनात्मक व उद्योजकता विकास उपक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या संकल्पनेतील “गाव तिथे उद्योजक” या महत्त्वाकांक्षी अभियानाशी वेदांशू पाटील यांचे नाव सक्रियपणे जोडले गेले आहे. उपाध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्तरावर या अभियानाला गती देत ग्रामीण भागातील युवकांना उद्योग, व्यवसाय व उद्योजकतेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
उत्तर महाराष्ट्रात नवीन औद्योगिक वसाहती, नव्या उद्योग संधी, स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती तसेच युवकांना उद्योजक बनविण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply