शेतकी संघ निवडणुकीत १५ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात; सर्वपक्षीय पॅनलचा अखेर प्रयत्न फसला

अमळनेर (प्रतिनिधी) तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून १५ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात उरले आहेत. सुरुवातीला एकूण १५५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, २० मे रोजी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी तब्बल १११ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाले.

अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून सर्वपक्षीय पॅनल उभे करून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र उमेदवारांची संख्या अधिक असणे आणि जागावाटपाचा तिढा न सुटल्याने हा प्रयत्न निष्फळ ठरला. परिणामी तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली “सहकार पॅनल” जाहीर केले असून या पॅनलमध्ये सर्व १५ जागांसाठी उमेदवार देण्यात आले आहेत. तर भाजपने खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली “किसान विकास पॅनल” उभे केले असून त्यात १४ उमेदवारांचा समावेश आहे. महिला राखीव गटात या पॅनलकडून एकच उमेदवार देण्यात आला आहे. काँग्रेसने “शेतकरी पॅनल” जाहीर केले असून सोसायटी मतदारसंघात उमेदवार न दिल्याने या पॅनलमध्ये एकूण १० उमेदवार आहेत. राखीव गटांमध्येही काही मातब्बर उमेदवारांनी मैदानात उतरल्यानाने निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, २१ मे रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप होणार असून ३० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर ३१ मे रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शेतकी संघाची निवडणूक होत असल्याने तालुक्यात या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे. विशेषतः व्यक्तिशः आणि सोसायटी मतदारसंघातील जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे.

 

असे आहे निवडणुकीचे चित्र

 

व्यक्तिशःच्या ५ जागांसाठी १८ उमेदवार, सोसायटीच्या ५ जागांसाठी १० उमेदवार, महिला राखीवच्या २ जागांसाठी ५ उमेदवार, ओबीसीच्या १ जागेसाठी ४ उमेदवार, अनुसूचित जाती-जमातीच्या १ जागेसाठी ४ उमेदवार तर व्हीजेएनटीच्या १ जागेसाठी ३ उमेदवार असे एकूण ४४ उमेदवार रिंगणात आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *