ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकरी मंडळाचा भक्तिरसात रंगला अनोखा सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) येथील ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित उन्हाळी शिबिरात शुक्रवारी वारकरी संप्रदायाच्या भक्तिरसाने न्हालेला आगळावेगळा सांस्कृतिक सोहळा अनुभवायला मिळाला. आळंदी येथून आलेल्या बाल वारकरी मंडळाच्या लहानग्या वारकऱ्यांनी शाळेच्या प्रांगणात हजेरी लावत अवघे वातावरण विठुनामाच्या गजराने भारून टाकले.

कार्यक्रमाला संस्था अध्यक्षा ॲड. ललिता पाटील, प्राचार्य डॉ. नीरज चव्हाण तसेच आळंदीहून आलेले ह.भ.प. सोपान शिरसाठ महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. टाळ-मृदुंगाच्या तालावर बाल वारकऱ्यांनी “ज्ञानोबा माऊली तुकाराम”चा जयघोष करत फुगडी, पिंगा आणि गोल रिंगण सादर केले. पांढरा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात तुळशीमाळा परिधान केलेली ही चिमुकली वारकरी मंडळी पाहून उपस्थित भारावून गेले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता सातवीतील विद्यार्थीनीने सादर केलेले कीर्तन. “विठ्ठल आवडी प्रेमभाव” या अभंगावर आधारित निरूपणातून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या विचारांचा प्रभावी उलगडा करण्यात आला. “देव पाहायला मंदिरात जाऊ नका, तो आपल्या आई-वडिलांच्या सेवेत आहे,” या भावस्पर्शी संदेशाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. तब्बल २० मिनिटे चाललेल्या या कीर्तनादरम्यान संपूर्ण सभागृह “विठ्ठल विठ्ठल”च्या नामस्मरणात तल्लीन झाले होते. कार्यक्रमाला पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *