कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड; अल खिदमत ट्रस्टचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अल खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर मुस्लिम कब्रस्तान परिसरात २५ वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमातून कब्रस्तान परिसर अधिक हिरवागार करण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला.

या वृक्षारोपण उपक्रमास अमळनेर मुस्लिम कब्रस्तान व ईदगाह ट्रस्टचे हाजी सत्तार भाया साहब तसेच अल खिदमत ट्रस्ट, अमळनेरचे सदस्य उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली.

या उपक्रमात लहान मुलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेत त्यांना झाडांचे जीवनातील महत्त्व, पर्यावरणाचे संरक्षण आणि भावी पिढीसाठी हिरवाई जपण्याची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. लहान वयातच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता. कब्रस्तान परिसरात लावण्यात आलेली झाडे भविष्यात सावली, स्वच्छ हवा आणि हिरवाई देण्यासोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे आवाहनही करण्यात आले. “आज लावलेले एक झाड म्हणजे उद्याच्या पिढीसाठी दिलेली जीवनाची भेट आहे,” या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक उपक्रमांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही समाजाने स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *