
कुर्हे खुर्दच्या सिटी सर्वे नोंदींवर ग्रामस्थांचा आक्षेप; फेरतपासणीची केली मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) : मौजे कुर्हे खुर्द, ता. अमळनेर येथील ग्रामस्थांनी भूमी अभिलेख कार्यालय, अमळनेर येथे निवेदन सादर करून गावातील सिटी सर्वेच्या नोंदींची फेरतपासणी करून त्या अचूक पद्धतीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.
कुर्हे खुर्द गावाचा सिटी सर्वेमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, सिटी सर्वेतील नोंदी ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८-अ प्रमाणे अचूक व स्वतंत्र पद्धतीने झालेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. सिटी सर्वेच्या नोंदींमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असून काही ग्रामस्थांच्या मालमत्तांच्या नोंदी झालेल्या नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच पुढे निवेदनात म्हटले आहे की, चुकीच्या व अपूर्ण नोंदींमुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. भविष्यात मालमत्तेचे हक्क, क्षेत्रफळ, मालकांची नावे तसेच मालमत्ता क्रमांक यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सिटी सर्वेतील सर्व नोंदी ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८-अशी पडताळून नव्याने सत्यापित कराव्यात आणि आवश्यक त्या दुरुस्त्या कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन भूमी अभिलेख कार्यालय, अमळनेर येथील संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्ष पडताळणी करावी आणि चुकीच्या व अपूर्ण नोंदी तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी विजय सूर्यवंशी, समाधान नारायण पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, नर्सिंग रावजी पाटील, राहुल पंडित पाटील, बापू कुंभार, सचिन पाटील, सुदाम गुरव, श्रीराम कोळी, भारत गुलाब पाटील, सूर्यकांत चौधरी, रणजीत नाना पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. निवेदनावर रंजना विजय सूर्यवंशी, पंडित लक्ष्मण पाटील, नर्सिंग रावजी पाटील, निलाबाई भिका कुंभार, नारायण पांडू पाटील, नवसारबाई लोटन न्हावी, रवींद्र हरसिंग पाटील, पंढरीनाथ हरसिंग पाटील, दिलीपरावजी पाटील, मुकेश ठान्सिंग पाटील, युवराज वामन पाटील, दगडू दामू पाटील, भारत गुलाब पाटील, अरुण गोकुळ पाटील, राजेंद्र लटकन पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply