
माहेरच्या आठवणींना पारिजाताचा सुगंध; डोळ्यांत अश्रू अन् मनात मायेची शिदोरी!
अमळनेर (प्रतिनिधी) : माहेर म्हणजे केवळ एक वास्तू नव्हे, तर आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवलेली मायेची ऊब, आठवणींचा सुगंध आणि आपलेपणाची अखंड सावली. याच भावविश्वाला पारिजाताच्या सुगंधाची जोड देत अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे श्री मंगळग्रह मंदिरात अमळनेरकर माहेरवाशिणींसाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘माहेरचा पारिजात’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात समारोप झाला.
समारोपप्रसंगी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित सर्व माहेरवाशिणींची पारंपरिक पद्धतीने ओटी भरून त्यांना माहेरची प्रेमळ भेट म्हणून पैठणी, फराळ आणि पारिजातकाचे रोप देण्यात आले. पैठणीच्या रूपाने माहेरची हळुवार आठवण, फराळाच्या रूपाने मायेची चव आणि पारिजातकाच्या रोपाच्या रूपाने नात्याला सदैव हिरवे ठेवण्याचा संदेश, अशा भावनिक त्रिवेणी संगमाने या उपक्रमाचा निरोप सोहळा संस्मरणीय ठरला. पारिजातकाचे रोप हातात घेताच अनेक माहेरवाशिणी भावूक झाल्या. ‘माहेरची आठवण केवळ मनात नाही, तर अंगणातही फुलवायची’ या भावनेतून त्यांनी पारिजातकाचे रोप लावून त्याचे पुढील दोन वर्षे मनापासून संगोपन करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या उपक्रमाची सांगता ही केवळ एका कार्यक्रमाचा शेवट न ठरता माहेरच्या नात्यांना निसर्गाच्या माध्यमातून जपण्याचा नवा संकल्प ठरला. यानंतर सर्व माहेरवाशिणींनी एकत्रितपणे अल्पोपहाराचा आस्वाद घेतला. निरोपाची वेळ जवळ येताच एकमेकींना आलिंगन देत डोळ्यांत आठवणींचे पाणी आणि चेहऱ्यावर माहेरच्या समाधानाचे हास्य घेऊन त्यांनी या अनोख्या उपक्रमाला भावनिक निरोप दिला. तीन दिवस माहेरच्या मायेचा अनुभव घेतल्यानंतर निरोप घेताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. माहेरची ओटी भरली, आठवणींची शिदोरी बांधली आणि अंगणात पारिजात रुजवला, अशा भावस्पर्शी वातावरणात ‘माहेरचा पारिजात’ या तीन दिवसीय उपक्रमाचा प्रवास पूर्ण झाला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या अध्यक्षा कांचनताई शहा, उपाध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सरोजताई भांडारकर, सचिव वसुंधराताई लांडगे व कोशाध्यक्षा प्रा. शीलाताई पाटील तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे सर्व विश्वस्त, सेवेकरी आणि कार्यकारी मंडळातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मंगळग्रह सेवा संस्थेच्या सेवेचे माहेरवाशिणींकडून कौतुक
दरम्यान, ‘माहेरचा पारिजात’ उपक्रमासाठी मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे सलग तीन दिवस करण्यात आलेल्या सेवारूपी विशेष सहकार्याचे माहेरवाशिणींनी मनापासून कौतुक केले. आयोजनातील आपुलकी, सेवाभाव आणि प्रत्येक क्षणात जाणवणारी माहेरची ऊब यामुळे हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमचा ठसा उमटवून गेला.

Leave a Reply