
श्री मंगळग्रह मंदिरात श्रावणानिमित्त पुरोहितांकडून सामूहिक रुद्र पूजन
अमळनेर (प्रतिनिधी) : श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत भक्तीमय व मंगलमय वातावरणात रुद्र महाभिषेक सोहळा पार पडला. श्री मंगळग्रह मंदिरातील पुरोहितांनी श्री मंगळेश्वर महादेवांच्या पिंडीवर विधिवत सामूहिक रुद्र महाभिषेक, पूजा-अर्चा आणि बिल्वार्चना केली.
श्री मंगळग्रह मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकांक्षी, हेमंत गोसावी, परशुराम शर्मा तसेच उमेश पाठक हे रुद्र महाभिषेक पूजेचे मानकरी होते. त्यांच्या पौरोहित्यात जल, दुग्ध आदींच्या अभिषेकासह विधिवत मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी ‘ॐ नमः शिवाय’चा सामूहिक जप करण्यात आल्याने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी श्रावण मासानिमित्त रुद्र महाभिषेकाचे आयोजन केले जाते. यंदाही पारंपरिक धार्मिक विधींचे पालन करून हा सोहळा भक्तिभावाने पार पडला. रुद्र महाभिषेकानिमित्त भाविकांनी भगवान महादेवांचे दर्शन घेत पूजा-अर्चा केली.
हिंदू धार्मिक परंपरेत श्रावण मासात भगवान महादेवांची उपासना, रुद्र महाभिषेक, महामृत्युंजय जप आणि शिवस्मरणाला विशेष महत्त्व आहे. ‘रुद्र’ हे भगवान महादेवांचे उग्र स्वरूप मानले जाते. रुद्र महाभिषेकाच्या माध्यमातून शिवतत्त्वाचे स्मरण, अंतःकरणाची शुद्धी आणि आध्यात्मिक समाधान प्राप्त होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
ढोलकीच्या तालावर शिवस्तुती; महाआरतीने सांगता
रुद्र महाभिषेकानंतर महाआरती करण्यात आली. घंटानाद, शंखनाद आणि मंत्रोच्चारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला. उपस्थित भाविकांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करीत महाआरतीत सहभाग घेतला. विशेष म्हणजे रुद्र महाभिषेकाच्या पौरोहित्यावेळी पुरोहितांनी ढोलकीच्या तालावर भगवान महादेवांची स्तुती करणारी गीतेही सादर केली. त्यामुळे धार्मिक वातावरणात आणखी भक्तिमय रंग भरला.
या धार्मिक सोहळ्याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी, भाविक आणि मंदिरातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply