
कचऱ्याचे ढिग अन् आगीच्या तावडीत वृक्ष; अमळनेरच्या स्वच्छतेचा उडाला बोजवारा!
अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील घनकचरा संकलन व्यवस्थेचा सध्या पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदाराकडून घराघरांतून तसेच सार्वजनिक ठिकाणांहून नियमित कचरा उचलला जात नसल्याने शहरातील विविध गल्लीबोळ, चौक, रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे शहरात शेकडो अनधिकृत कचरा स्पॉट तयार झाले असून, पावसाळ्यात कुजलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. डास, माश्या आणि रोगराई पसरविणाऱ्या घटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक भागांत नागरिकांना अक्षरशः नाक दाबून वावरावे लागत असून, कुजलेल्या कचऱ्याचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, गॅस्ट्रो आणि अतिसार यांसारख्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे शहरातील डेरेदार वृक्षांच्या परिसरातही कचऱ्याचे ढिग साचत आहेत. काहीजण हा कचरा पेटवून देत असल्याने आगीचा थेट फटका वृक्षांना बसत आहे. कचरा जाळल्यामुळे वृक्षांच्या बुंध्यांची साल जळण्यासह मुळांनाही नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे पालिकेकडून वृक्षलागवड आणि पर्यावरण संवर्धनाचा गाजावाजा केला जात असताना दुसरीकडे वर्षानुवर्षे वाढवलेल्या डेरेदार वृक्षांच्या बुंध्याशी कचरा साचून तो पेटवला जात असल्याने पर्यावरण संवर्धनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुदतवाढीमुळे ठेकेदाराची मनमानी?
पालिकेने नाशिक येथील मे. एस.आर.ग्रीन वे एम्पायर या कचरा संकलन ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्याने ठेकेदाराची मनमानी वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. नवीन कचरा संकलनाचा ठेका देण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था आणखी ढासळली असल्याची नागरिकांची तक्रार आहे. नागरिकांकडून कर वसूल केला जात असतानाही समाधानकारक स्वच्छता सेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
पालिका प्रशासनाने नवीन ठेका प्रक्रिया तातडीने पूर्ण करून नियमित कचरा संकलन सुरू करावे, शहरातील सर्व कचरा स्पॉट हटवावेत, वृक्षांच्या परिसरातील कचरा तातडीने साफ करावा तसेच कचरा जाळणाऱ्यांसह निष्काळजी ठेकेदारावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल
शहरातील स्वच्छतेबाबत कोणतीही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. शहरातील सर्व कचरा स्पॉट तातडीने हटवून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. घनकचरा संकलनाच्या ठेकेदाराकडून करारानुसार काम होत नसल्यास त्याची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. नवीन ठेका प्रक्रिया लवकर पूर्ण करून नियमित व प्रभावी कचरा संकलन व्यवस्था सुरू करण्यात येईल. तसेच वृक्षांच्या परिसरात कचरा जाळणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. परीक्षित बाविस्कर, लोकनियुक्त नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद
‘कचऱ्याच्या ढिगांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात’
शहरात अनेक दिवस नियमित कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. दुर्गंधी, डास-माश्यांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वृक्षांखाली साचलेला कचरा जाळल्याने पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. एकीकडे वृक्षलागवड केली जाते, तर दुसरीकडे अस्तित्वातील वृक्षांचे संरक्षण होत नाही, ही गंभीर विसंगती आहे. पालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा स्पॉट हटवून नियमित कचरा संकलन सुरू करावे, नवीन ठेका प्रक्रिया लवकर पूर्ण करावी आणि निष्काळजी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी.
-स्वर्णदीप राजपूत, पर्यावरणप्रेमी, अमळनेर

Leave a Reply