लाखोंचा रस्ता पोलच्या कैदेत; पालिकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात!

अमळनेर (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य बाजारपेठेतील न्यू प्लॉट परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज गार्डन आणि भारतीय डाक कार्यालयादरम्यानचा महत्त्वाचा रस्ता पालिकेने दोन्ही टोकांना लोखंडी पोल उभारून वर्षानुवर्षे बंद ठेवला आहे. लाखो रुपये खर्च करून काँक्रिटीकरण केलेला आणि सुस्थितीत असलेला रस्ता नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्याऐवजी लोखंडी पोलच्या कैदेत ठेवण्यात आल्याने पालिका प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्य बाजारपेठेला जोडणारा हा रस्ता बंद असल्याने नागरिकांना ये-जा करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, तयार रस्ता वापराविना पडून आहे. विशेष म्हणजे परिसरातील वर्दळ कमी झाल्याने रस्ता आणि त्यालगतचा भाग काही प्रमाणात निर्जन बनला आहे.

या निर्जनतेचा फायदा घेत दुपारच्या वेळी ग्रामीण भागातून येणारे काही तरुण-तरुणी येथे थांबून अश्लील चाळे करत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. तसेच रात्रीच्या वेळीही काही तरुण-तरुणी या ठिकाणी थांबून असामाजिक कृत्ये करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे परिसरातील महिला, व्यापारी आणि रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

रस्ता खुला केल्यास या परिसरातील नागरिकांची वर्दळ वाढेल, निर्जनता कमी होईल आणि गैरप्रकारांवरही काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते, अशी नागरिकांची भूमिका आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता बंद ठेवण्यामागे पालिका प्रशासनाचा नेमका हेतू काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, महिला आणि परिसरातील रहिवाशांनी यापूर्वीही पालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे लोखंडी पोल हटवून रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे. मात्र वारंवार सूचना करूनही अद्याप पोल हटविण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे.

 

‘रस्ता जनतेसाठी की लोखंडी पोलसाठी?’ असा सवाल आता

 

 नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. एकीकडे शहरातील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न कायम असताना दुसरीकडे लाखो रुपये खर्चून तयार केलेला रस्ता वर्षानुवर्षे बंद ठेवणे म्हणजे पालिकेच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना असल्याची भावना व्यक्त होत आहे. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून लोखंडी पोल हटवावेत आणि नागरिकांसाठी रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे. तसेच परिसरात पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी आणि रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून गैरप्रकारांना आळा घालावा, अशीही मागणी नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तयार केलेला रस्ता आणखी किती वर्षे बंद ठेवणार, याचे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाने द्यावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *