अमळनेरात बेकायदेशीर खत साठ्यावर कृषी विभागाची कारवाई; कडक युरिया आढळल्याने गोदाम केले सील

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील बेकायदेशीर खत साठा करणाऱ्या खत व्यापाऱ्यांच्या गोदामांवर कृषी विभागाने अचानक छापे टाकून तपासणी केली असता एका गोदामात एक वर्षांपूर्वीचा कडक झालेला युरिया साठा आढळून आला. याप्रकरणी संबंधित व्यापाऱ्याचे गोदाम सील करण्यात आले असून पुढील फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की कृषी विकास अधिकारी पद्मानाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, तालुका स्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन वानखेडे तसेच एरंडोल तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निखिल तोळकर यांनी प्राप्त तक्रारीनुसार शहरातील दोन ते तीन खतांच्या गोदामांची तपासणी केली. यात मुंबई गल्ली परिसरातील संजय जैन नामक व्यापाऱ्याच्या गोदामाजवळ अधिकारी वर्ग पोहोचला असता सुरुवातीला संबंधित व्यापाऱ्याने हे गोदाम आपले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जागेच्या मालकाने कबुली दिल्यानंतर व्यापाऱ्याने गोदाम असल्याचे मान्य केले. गोदामाची तपासणी केली असता सप्टेंबर २०२५ मधील युरिया साठा आढळून आला. हा युरिया कडक झालेल्या अवस्थेत होता तसेच गोदामात माल सुरक्षित ठेवलेला नसून वरून पाणी झिरपल्याचेही आढळले. काही व्यापारी नियोजित गोदामातून माल इतरत्र हलवून खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करतात व जादा दराने विक्री करतात. तसेच कालबाह्य किंवा खराब झालेला माल शेतकऱ्यांना विकला जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. या तपासणीत कृषी नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित गोदाम सील करण्यात आले असून संबंधित व्यापाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *