
पिंपळे रोडवरील खड्डा बुजवण्यासाठी दगड-विटांचा मलबा; वाहनधारक हैराण, अपघातांची मालिका
अमळनेर (प्रतिनिधी ) शहरातील मुख्य मार्ग असलेल्या पिंपळे रोडवरील निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. मात्र हा खड्डा योग्य पद्धतीने दुरुस्त करण्याऐवजी पालिकेच्या बांधकाम विभागाने तब्बल आठ दिवसांपूर्वी त्यात दगड व विटांचा मलबा टाकून तात्पुरती मलमपट्टी केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे.
मोठ्या दगड-विटांच्या मलब्यावरून दुचाकी घसरत असल्याने दररोज लहान-मोठे अपघात घडत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेष म्हणजे या प्रकाराकडे संबंधित प्रभागातील नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. सध्या ढेकू रोडवरील काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने त्या भागातील नागरिक देखील पर्यायी मार्ग म्हणून पिंपळे रोडचा वापर करत आहेत. परिणामी वाहतुकीचा ताण अधिक वाढला आहे. तसेच या परिसरात सुमारे २२ ते २५ नागरी वसाहती असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची सतत वर्दळ असते. शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने या रस्त्याचा वापर करतात.
तरीही प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न देता केवळ दिखाऊ उपाययोजना केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे तात्काळ दगड-विटांचा मलबा हटवून खडी व डांबराच्या योग्य मिश्रणाने रस्ता दुरुस्त करावा व सुरक्षित वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी पिंपळे रोड परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply