
सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल व साने गुरुजी बालवाडीत होळी उत्सव साजरा
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात विविध शाळांमध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तांबेपुरा येथील सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूल तसेच अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी बालवाडी विभागात विद्यार्थ्यांनी आनंद, उत्साह आणि रंगांच्या उधळणीत होळी व रंगपंचमीचा उत्सव साजरा केला.
तांबेपुरा येथील सी. आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेच्या प्रांगणात विधीपूर्वक होळी प्रज्वलित करून वाईट प्रवृत्तींचा त्याग व चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला होळी सणाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत प्रतीकात्मक स्वरूपात होळी प्रज्वलित करून उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सुरक्षितता आणि पर्यावरणाची काळजी घेत सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी होळीवरील गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. काही विद्यार्थ्यांनी होळीच्या परंपरा आणि सामाजिक एकतेबाबत आपले विचार मांडले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला. कार्यक्रमात शाळेचे चेअरमन, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी एकमेकांना होळीच्या शुभेच्छा देत आनंद साजरा केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परंपरांविषयी आदर, एकोप्याची भावना आणि सामाजिक जाणीव अधिक दृढ झाली.
साने गुरुजी बालवाडी विभाग
अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी बालवाडी विभागातही रंगपंचमीचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. “रेड, यलो, ग्रीन अँड ब्ल्यू – होळी ब्रिंग्स जॉय टू मी अँड यू” या आनंददायी वातावरणात लहानग्यांनी रंगांचा उत्सव अनुभवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बालवाडी विभागाचे अध्यक्ष हेमकांत पाटील व सचिव संदीप घोरपडे यांनी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. मुख्याध्यापिका वैशाली महाजन यांनी होळी सणाची थोडक्यात माहिती देत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक सण साजरा करण्याचे महत्त्व सांगितले. त्यानंतर हर्बल रंगांचा वापर करून सर्व बालवाडीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांसह विविध रंग आणि पिचकारीच्या माध्यमातून रंगपंचमीचा आनंद लुटला. या रंगतदार कार्यक्रमामुळे लहानग्यांमध्ये आनंद, मैत्री, आपुलकी आणि सणांच्या परंपरेविषयी प्रेमाची भावना अधिक बळकट झाली.

Leave a Reply