
अमळनेर तालुक्यात मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण अपूर्ण; इंग्रजीची पुस्तके प्रतीक्षेत, उर्वरित गणवेश पुढील आठवड्यात
अमळनेर (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही अमळनेर तालुक्यातील काही विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके अद्याप मिळालेली नाहीत. विशेषतः इयत्ता सहावीच्या इंग्रजी विषयाची पाठ्यपुस्तके अद्याप प्राप्त झालेली नसून, इतिहास विषयाचे काही संच अपूर्ण स्वरूपात आले आहेत. ही पुस्तके लवकरच उपलब्ध करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येतील, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोफत गणवेश वितरणाचे कामही अंतिम टप्प्यात असून, एकूण ९ हजार २३१ लाभार्थी विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत ४ हजार ८७२ विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील आठवड्यात संबंधित शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावर गणवेश वितरित करण्यात येणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्य शासनाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे. इयत्ता दुसरी, तिसरी व चौथीच्या शिक्षकांचे चार दिवसीय प्रशिक्षण प्रताप महाविद्यालयात सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सुरू असून, त्यामध्ये नवीन अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षणाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
इयत्ता सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पुढील आठवड्यात आयोजित करण्यात येणार असून, उर्वरित राहिलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षणही त्याच कालावधीत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती प्रमोद पाटील यांनी दिली. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वेळेत मिळावेत, अशी पालकांची अपेक्षा आहे. उर्वरित पाठ्यपुस्तके आणि गणवेशाचे वितरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Leave a Reply