
अंतुर्लीत २४ नोव्हेंबरला कार्तिक स्वामींची यात्रा; दीड ते दोन लाख भाविकांची उपस्थिती अपेक्षित
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंतुर्ली येथील अतिप्राचीन कार्तिक स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राच्या शुभयोगावर मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी भव्य यात्रा महोत्सव होणार आहे. यंदा सुमारे दीड ते दोन लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता असून, भाविकांच्या सुविधांसाठी ग्रामस्थ व संस्थेच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी कार्तिक पौर्णिमेला प्रारंभ होणार असून, मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजून २४ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल. तसेच कृत्तिका नक्षत्र सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री २ वाजून २ मिनिटांनी सुरू होऊन मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून १५ मिनिटांपर्यंत राहणार आहे. कार्तिक पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्राचा हा योग अत्यंत पवित्र मानला जात असल्याने कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून भाविक येणार आहेत.
पौराणिक आख्यायिकेनुसार माता पार्वती व भगवान शंकर यांचे पुत्र श्रीगणेश आणि कुमार कार्तिकेय यांच्याशी या तीर्थक्षेत्राचा संबंध आहे. कार्तिक स्वामींचे वाहन मोर आणि पृथ्वी प्रदक्षिणेच्या कथेशी जोडलेले हे स्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. अंतुर्ली येथील कार्तिक स्वामी मंदिर अतिप्राचीन असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इ.स. १६५३ मध्ये या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगितले जाते. तत्कालीन सरदार रामराव पाटील यांनी प्रत्यक्ष स्वामींचे स्थान पाहिल्यानंतर येथे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने टेकडीवर मंदिर बांधण्यात आले. या मंदिराशी अनेक पिढ्यांची श्रद्धा व धार्मिक परंपरा जोडलेल्या आहेत.
यात्रेदरम्यान भाविकांना सुलभ व व्यवस्थित दर्शन घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रास्थळी फराळाची दुकाने, हॉटेल्स व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध राहणार आहेत. तसेच भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विश्रांतीसाठी मंडप उभारण्यात आले आहेत. ग्रामस्थ व विविध संस्थांच्या सहकार्याने यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी ग्रामस्थ व संस्थेच्या वतीने केले आहे.

Leave a Reply