
लोखंडी पट्टी पोटात घुसल्याने गाय गंभीर जखमी; तातडीच्या उपचारांनी वाचले प्राण
विहिंप-बजरंग दलाच्या गोरक्षकांच्या तत्परतेने जखमी गाईला जीवदान

अमळनेर (प्रतिनिधी) विश्व हिंदू परिषद बजरंग दल, अमळनेर यांच्या गोरक्षकांनी तत्परता दाखवत गंभीर जखमी झालेल्या गाईवर वेळेत उपचार करून तिचे प्राण वाचवले. या कार्याबद्दल परिसरात गोरक्षकांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार, १० मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ६ वाजेच्या सुमारास अमळनेर रेल्वे स्टेशन परिसरात एका गाईच्या पोटात लोखंडी पट्टी घुसल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली. या घटनेत गाय गंभीर जखमी झाली असून तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. माहिती मिळताच विश्व हिंदू परिषद बजरंग दल अमळनेरचे गोरक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डॉक्टरांच्या टीमला पाचारण करून गाईवर त्वरित उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे गाईची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी गोरक्षकांनी नागरिकांना रस्त्यावर लोखंडी व अन्य धोकादायक वस्तू न टाकण्याचे आवाहन केले. मुक्या जनावरांची काळजी घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. “गोमातेची सेवा हीच खरी मानवसेवा” असा संदेश देत कार्यकर्त्यांनी गोसेवेचे कार्य पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply