स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषदेचा दिमाखदार पदग्रहण सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना, शिस्त आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या प्रदान करण्यात आल्या.

या सोहळ्यात मुख्य विद्यार्थी, मुख्य विद्यार्थिनी तसेच विविध पदांवरील विद्यार्थी प्रतिनिधींना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. अग्नी हाऊस, आकाश हाऊस, पृथ्वी हाऊस आणि सूर्य हाऊस या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व आकर्षक संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या दिमाखदार संचलनामुळे संपूर्ण परिसर उत्साह आणि देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला. कार्यक्रमाला अमळनेर शहराचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम तसेच पोलीस उपनिरीक्षक ठाणगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थी पदाधिकाऱ्यांना बॅज व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वक्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. यावेळी शाळेचे चेअरमन डी. डी. पाटील, अध्यक्षा सितीका अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, संचालिका ममता अग्रवाल आणि आचल अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती. तसेच सल्लागार समितीच्या सदस्य वसुंधरा लांडगे, अर्चना जोशी आणि डॉ. शरद बाविस्कर यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

 

‘जबाबदार नागरिक घडण्यासाठी विद्यार्थी परिषदेचा अनुभव उपयुक्त’

 

प्रमुख पाहुण्यांनी मनोगतात विद्यार्थ्यांना नेतृत्व, कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून मिळणारा अनुभव भविष्यात यशस्वी आणि जबाबदार नागरिक घडण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण कार्यक्रम मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाने सर्व शिक्षकांच्या सहकार्याने उत्कृष्टरीत्या पार पाडला. विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि शिस्त यांचे प्रेरणादायी दर्शन घडविणारा हा पदग्रहण सोहळा उपस्थितांच्या स्मरणात राहणारा ठरला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *