जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; डॉ. ए.बी. जैन यांच्याकडून ₹५१ हजारांची देणगी

अमळनेर (प्रतिनिधी): खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस. हायस्कूलचा ८८ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर होते. तर खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष निरज अग्रवाल, प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी. जैन आणि संस्थेचे अध्यक्ष विनोद अग्रवाल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कमल कोचर, माधुरी पाटील, विश्वस्त वसुंधरा लांडगे, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी, संचालक डॉ. संदेश गुजराथी, योगेश मुंदडा, लीना पाटील, संस्थेचे देणगीदार अभिजीत भांडारकर, विवेकानंद भांडारकर, निलेश भांडारकर, अनिल वैद्य, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.डी. जाधव, संस्थेचे सचिव प्रा. पराग पाटील, सहचिटणीस प्रा. डॉ. व्ही.बी. मांटे, शिक्षक प्रतिनिधी आर.जे. पाटील, तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. परिक्षीत बाविस्कर यांनी शाळा ही केवळ शिक्षणाची नव्हे तर संस्कारांचीही पवित्र संस्था असल्याचे सांगितले. मेहनत, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या बळावर विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जी.एस. हायस्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान व्यक्त करत शाळा व संस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी यांनी संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रताप महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. ए.बी. जैन यांनी शाळेला ₹५१ हजारांची देणगी जाहीर करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला. तसेच वर्धापन दिनाचा विशेष लोगो फुग्यांच्या सहाय्याने आकाशात सोडून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचा वार्षिक अहवाल मुख्याध्यापक व्ही.एम. पाटील यांनी सादर केला. प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.आर. शिंगाणे यांनी केले, तर अध्यक्षांचा परिचय उपमुख्याध्यापक ए.डी. भदाणे यांनी करून दिला.

यावेळी एसएससी परीक्षेत, विविध स्पर्धा परीक्षा तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त शिक्षक, उद्योजक आणि शाळेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ए.ए. पाटील यांनी केले, तर आभार पर्यवेक्षक के.पी. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *