
कळमसरेच्या नेहा महाजन यांना गणित विषयात पीएचडी प्रदान
गावातील पहिली सुकन्या ठरल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कळमसरे येथील माजी सरपंच मनिषा महाजन व बांधकाम व्यावसायिक तथा माजी उपसरपंच मुरलीधर महाजन यांची कन्या नेहा मुरलीधर महाजन (भंगाळे) यांना मॅथेमॅटिक्स विषयामध्ये पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कळमसरे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेहा महाजन या संकेत रामकृष्ण भंगाळे यांच्या पत्नी असून जळगाव येथील नंदिनीबाई मुलींचे विद्यालयातील शिक्षिका जयश्री रामकृष्ण भंगाळे व निवृत्त लिपिक रामकृष्ण सिताराम भंगाळे यांच्या त्या सुन आहेत. त्यांच्या संशोधन कार्यासाठी गाईड म्हणून डॉ. नरेंद्र स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच को-गाईड म्हणून कळमसरे येथील रहिवासी तथा आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, चिखलदरा येथील प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले.
नेहा महाजन (भंगाळे) यांनी कठोर परिश्रम, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांचे पती संकेत भंगाळे यांचाही मॅथेमॅटिक्स विषय असल्याने त्यांचेही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले.
कळमसरे गावातील पहिली सुकन्या म्हणून पीएचडी पदवी मिळविण्याचा मान नेहा महाजन (भंगाळे) यांनी मिळविल्याने त्यांच्यासह आई-वडील, पती तसेच सासू-सासरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply