अमळनेर विधानसभा मतदारसंघात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम

बीएलओ करणार घरोघरी पडताळणी ; जूनपासून प्रक्रिया सुरू

 

अमळनेर (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला असून महाराष्ट्राचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अमळनेर विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांचे विशेष पुनरिक्षण करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी दिली.

या मोहिमेंतर्गत मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट’ (बी एल ए ) देखील सहकार्य करणार आहेत.

सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामाचा विचार करून या पुनरिक्षण मोहिमेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. जून महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होणार असून ऑक्टोबर २०२६ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

महत्त्वाचे वेळापत्रक

 

२० ते २९ जून २०२६ दरम्यान बीएलओंना प्रशिक्षण व पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन माहिती संकलन केले जाईल. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होईल. तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. अंतिम मतदार यादी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

राजकीय पक्षांनाही आवाहन

 

भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले बीएलए नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्या पात्र मतदारांची नोंदणी अधिक अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार असल्याचे उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *