
अमळनेरमध्ये १९ मार्चला ‘भूमी सुपोषण’ चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवार, दि. १९ मार्च रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. १३ मार्च रोजी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळग्रह मंदिरात सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक झाली.
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, कृषी विभागाचे उपसंचालक भरत इंगळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे व उपकार्यकारी अभियंता नितीन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मंदिरातील अभिषेकगृहात चित्रदूरसंवाद प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आशिष चौधरी यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणसह अन्य डिजिटल जबाबदाऱ्या सांभाळल्या.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांशी चित्रदूरसंवादाद्वारे चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. सर्व कृषी अधिकाऱ्यांनी भूमी सुपोषणाच्या प्रसारासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.या वेळी बोलताना घुगे म्हणाले, की देशातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही चळवळ प्रत्यक्षात लोकचळवळ आहे. मात्र, या चळवळीला शासकीय पाठबळ मिळाल्यास ती अधिक प्रभावी व व्यापक होईल. त्यामुळे प्रशासनातील सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक आहे.अमळनेरकडे येणारे व बाहेर पडणारे सर्व रस्ते तपासून रस्त्यांशी संबंधित समस्या तातडीने सोडवण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सती माता मंदिराजवळील बोगदा व रस्ता समस्या युद्धपातळीवर सोडवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशामक दल, रुग्णवाहिका, पुरेसे पोलीस बंदोबस्त आदी व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले, की कृषी क्षेत्रातील सर्व घटकांपर्यंत जाऊन या उपक्रमाची माहिती व उपयुक्तता पोहोचवणे आवश्यक आहे. त्यांनी यासाठी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करताना सांगितले, की १९ मार्चचा कार्यक्रम देशातील सर्व कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये तसेच देशातील प्रमुख ६०० जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक तांत्रिक तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित अधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळ, वाहनतळ, मान्यवर वाहनतळ, आगमन-निर्गमन मार्ग, स्वच्छतागृहे, रस्ते आदी सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दरम्यान, बैठकीनंतर अप्पर पोलीस अधीक्षक कविता पवार-नेरकर यांनीही मंदिर व कार्यक्रमस्थळाला भेट देऊन सुरक्षेबाबत आवश्यक सूचना दिल्या.
दर्शन आणि स्वागत-सत्कार
जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रोहन घुगे यांनी प्रथमच श्री मंगळग्रह मंदिराला भेट दिली. डॉ. डिगंबर महाले यांनी मंदिराचा इतिहास व महत्त्व यांची माहिती दिली. यावेळी श्री. घुगे व मीनल करणवाल यांनी विधिवत पूजाही केली. मंदिरातर्फे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम व मंगल सेवेकरी प्रकाश मेखा यांनी त्यांचा सत्कार केला.
अमळनेरचीच निवड का?
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात दाक्षिणात्य शैलीतील भूमी मातेची विश्वातील एकमेव मूर्ती आहे. तसेच भूमीपुत्र श्री मंगळग्रहाची स्वयंभू मूर्ती येथे असल्याने या मंगल नगरीचे स्थानमहात्म्य लक्षात घेऊन भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभासाठी अमळनेरची निवड करण्यात आली आहे.
१९ मार्चचे खास वैशिष्ट्य
गुरुवार, दि. १९ मार्च रोजी वर्षप्रतिपदा आहे. हा दिवस भूमी मातेचा जन्मदिवस मानला जातो. त्याच दिवशी हिंदू नववर्षारंभ व गुढीपाडवा असल्याने, साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त साधून भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply