
रणाईचे-भरवस तीर्थक्षेत्रासाठी २ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर : आमदार अनिल भाईदास पाटील
सभामंडप, डोम आणि सुशोभीकरणाची कामे होणार
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे व भरवस येथील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाकडून २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतून मंदिर परिसरात सभामंडप, डोम, सुशोभीकरण तसेच पर्यटनासंदर्भातील विविध विकासकामे मार्गी लागणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ११ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश प्राप्त झाले असून त्यात रणाईचे व भरवस येथील देवस्थानांचा समावेश आहे. या निधीतून रणाईचे येथील महानुभाव पंथाचे श्रीकृष्ण मंदिर परिसरात सभामंडप बांधकामासाठी १ कोटी, मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी १ कोटी, तसेच सभामंडप व डोम बांधकामासाठी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय भरवस येथील श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसरात पर्यटन विषयक विविध विकासकामांसाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण २ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांचा यात समावेश आहे.
अमळनेर तालुक्यातील रणाईचे व भरवस ही महानुभाव पंथाची महत्त्वाची तीर्थक्षेत्रे असून येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. आमदार अनिल पाटील यांचीदेखील या परंपरेशी भावनिक नाळ जोडलेली आहे. भाविकांच्या सोयीसाठी तसेच मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी रणाईचे येथील प.पु.प.म. वर्धनस्थ बिडकर बाबा महानुभाव तसेच भरवस येथील प.पु. ढोकिकर बाबा यांनी केली होती.
याशिवाय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य कारंजेकर बाबा व प्रकाशशेठ नन्नावरे यांनीही राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी शासनाकडे निधीची मागणी केली होती. अखेर राज्य शासनाने या तीर्थक्षेत्रांसाठी निधी मंजूर केल्याने भाविकांची मोठी सोय होणार असून रणाईचे व भरवस येथील तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या निधीच्या मंजुरीबद्दल आमदार अनिल पाटील व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply