
पातोंडा येथे दहा मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित; शेतकऱ्यांना आता दिवसा वीजपुरवठा
अमळनेर (प्रतिनिधी) :अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथे दहा मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प रविवारी (दि. २७) कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पामुळे पातोंडा उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या हजारो शेतीपंप ग्राहकांना आता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतात जाऊन मोटार सुरू करण्याची गरज राहणार नसून शेतीची कामे अधिक सुरक्षितपणे आणि वेळेत करणे शक्य होणार आहे.
या योजनेचा थेट लाभ पातोंडा, खवशी, नांद्रे, मुंगसे, मठगव्हाण, मालखेडा, खापरखेडा, रुंधाटी, गंगापुरी आदी गावांतील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे. दिवसा नियमित वीज उपलब्ध झाल्याने सिंचनाचे नियोजन अधिक सुलभ होऊन शेती उत्पादनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या तेहतीस केव्ही पातोंडा फिडरवर अंबरीषी, सारबेटा, पातोंडा आणि निमगव्हाण अशी चार उपकेंद्रे जोडलेली आहेत. पीक हंगामात वीजेवरील भार वाढल्याने अनेकदा कमी-जास्त व्होल्टेजची समस्या निर्माण होत होती. ही अडचण दूर करण्यासाठी अमळनेर येथील दोनशे वीस केव्ही उपकेंद्रातून पातोंडा उपकेंद्रासाठी स्वतंत्र तेहतीस केव्ही फिडर मंजूर करण्यात आला आहे. हा फिडर कार्यान्वित झाल्यानंतर वीजपुरवठा अधिक स्थिर आणि दर्जेदार होण्यास मदत होणार आहे.
व्होल्टेजची समस्याही मोठ्या प्रमाणात होणार दूर
“पातोंडा येथील १० मेगावॅट सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे पातोंडा उपकेंद्रांतर्गत शेतीपंप ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दिवसा वीजपुरवठा मिळेल. तसेच अमळनेर २२० केव्ही उपकेंद्रातून पातोंडासाठी स्वतंत्र ३३ केव्ही फिडर मंजूर झाल्याने भविष्यात कमी-जास्त व्होल्टेजची समस्याही मोठ्या प्रमाणात दूर होईल.”
— मनोज बंजारा, सहाय्यक अभियंता, महावितरण

Leave a Reply