प्रताप पॅटर्नमध्ये जेईई, नीट व एमएचटी-सीईटी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

अमळनेर (प्रतिनिधी) प्रताप पॅटर्नमार्फत व्हीए क्वांटम इन्स्टिट्यूटच्या वतीने सन २०२६ मध्ये जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी या प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. अमळनेर शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांना उच्च ध्येय निश्चित करून यशाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित करणे हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाला खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष नीरज अग्रवाल आणि कार्यउपाध्यक्ष जितेंद्र मोहनलाल जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे संचालक हरी भीका वाणी, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, उपप्राचार्य प्रा. ए. के. अग्रवाल, खानदेश शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष माधुरी प्रमोद पाटील, संचालिका लीना प्रवीण पाटील, उपाध्यक्ष कमल कोचर, विश्वस्त वसुंधरा लांग्रे, चिटणीस प्रा. पराग पाटील, अमोल मानके तसेच प्रताप पॅटर्नचे समन्वयक वसंत पाटील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी सर्व मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रताप पॅटर्नची माजी विद्यार्थिनी राजनंदिनी यादव हिने केले. या कार्यक्रमात सन २०२६ मधील जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या ३० विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सत्कार होताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.

मार्गदर्शन करताना प्रताप पॅटर्नचे संचालक विक्रांत कुमार यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी केवळ पाठांतर पुरेसे नसून विषयातील मूलभूत संकल्पना सखोलपणे समजून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विज्ञान हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नसून दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीत विज्ञान दडलेले असल्याने विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषय समजून घेऊन अभ्यास करण्याची सवय लावावी. नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्यपूर्ण सराव यामुळेच मोठे यश मिळू शकते, असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जेईई किंवा नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये चांगले यश मिळत नाही, असा चुकीचा समज पसरविला जात आहे. हा समज पूर्णपणे निराधार असून योग्य मार्गदर्शन, नियोजनबद्ध अभ्यास आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटी या तिन्ही परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवू शकतात. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आपल्या यशाचे श्रेय नियमित अभ्यास, शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्तबद्ध दिनचर्या आणि पालकांच्या मोलाच्या सहकार्याला दिले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थित विद्यार्थी प्रेरित झाले. अनेक विद्यार्थ्यांनी पुढील वर्षी याच व्यासपीठावर सन्मानित होण्याचा निर्धार व्यक्त केला.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *