अतिवृष्टीग्रस्त भागांची खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून पाहणी; नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीचे दिले आश्वासन

अमळनेर (प्रतिनिधी)  अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत नुकसान झाले असून, या नुकसानग्रस्त भागांची खासदार स्मिताताई वाघ यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासनामार्फत पात्र नुकसानग्रस्तांना आवश्यक ती सर्व मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची तत्काळ दखल घेत खासदार स्मिताताई वाघ यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे तसेच गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला होता. ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे तसेच जे नागरिक बेघर झाले आहेत, अशा सर्व प्रकरणांचे तातडीने पंचनामे करून शासनाच्या नियमांनुसार मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी आज प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त घरांची तसेच परिसरातील नुकसानीची माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त नागरिकांना त्वरित दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

नागरिकांशी संवाद साधताना खासदार स्मिताताई वाघ म्हणाल्या, “या संकटाच्या काळात आपण एकटे नाही. शासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी आहोत. प्रत्येक पात्र नुकसानग्रस्ताला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे.”

अतिवृष्टीमुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी पंचनाम्याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. नुकसानग्रस्त नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची भूमिका खासदार स्मिताताई वाघ यांनी यावेळी स्पष्ट केली. खासदार स्मिताताई वाघ यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल नुकसानग्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले. शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पंचनामे व इतर आवश्यक कार्यवाही वेगाने करावी, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर अध्यक्ष योगेश महाजन, पातोंडा अध्यक्ष राहुल पाटील, नगरसेवक बाळू पाटील, नगरसेवक विजय पाटील, माजी अध्यक्ष हरचंद लांडगे, हिरालाल पाटील, राकेश पाटील, दीपक भोई, मच्छिंद्र लांडगे, सरचिटणीस देवा लांडगे, युवा मोर्चाचे राहुल चौधरी, हिरालाल पाटील, कल्पेश पाटील, राजेश खरारे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *