
शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर टाकला प्रकाश
अमळनेर (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने विविध स्पर्धातून दोन्ही राष्ट्रीय पुरुषांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
धनदाई महाविद्यालय
अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य क्षेत्रातील बहुमोल योगदानासह सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी उभारलेल्या विविध चळवळीतील कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे आजच्या काळातील महत्त्वही अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले तर आभार मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील यांनी मानले. याप्रसंगी प्रा. डॉ. किशोर पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. रमेश पावरा, डॉ. भगवान भालेराव, प्रा. डॉ. महादेव तोंडे, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
लोंढवे माध्यमिक विद्यालय
स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात झाला. या निमित्ताने विद्यालयात दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. त्यांच्या देशप्रेम, समाजसुधारणा, शिक्षणप्रेम तसेच साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानाची माहिती विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मांडली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक डि. बी. सोनवणे आणि मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्रजागृतीच्या कार्यात दिलेल्या योगदानाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सामाजिक समतेसाठी मांडलेले विचार विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले. महापुरुषांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे असून, त्यांच्या जीवनातून देशप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि समतेची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या विचारांचा केवळ अभ्यास न करता त्यांच्या विचारांनुसार आचरण करण्याचा प्रयत्न करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि. एम. पवार यांनी केले.
जी. एस. हायस्कूलमध्ये
अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी. एस. हायस्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी दोन्ही महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि राष्ट्रजागृतीमध्ये दिलेले योगदान, तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य व सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात केलेले कार्य यांचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एम. पाटील, उपमुख्याध्यापक ए. डी. भदाणे, पर्यवेक्षक एस. आर. शिंगाणे, सी. एस. सोनजे, संस्थेचे शिक्षक प्रतिनिधी आर. जे. पाटील, मुख्य लिपिक जयश्री भालेराव, प्रशांत काटकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अंगीकारावा, यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply