दहा दिवसांपूर्वी तक्रार, तरीही डीपी बदलली नाही; सारबेटे बुद्रुक दोन दिवसांपासून बुडाले अंधारात!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सारबेटे बुद्रुक गावातील संपूर्ण वीजपुरवठा मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने संपूर्ण गाव अंधारात आहे. गावातील वारंवार नादुरुस्त होणारी डीपी बदलण्यात यावी, अशी मागणी गावातील तरुणांनी तब्बल दहा दिवसांपूर्वी महावितरणच्या ऑनलाइन तक्रार प्रणालीवर केली होती. मात्र, त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर डीपी बंद पडून संपूर्ण गावाचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे.

सारबेटे बुद्रुक गावाला ढेकू बुद्रुक सबस्टेशनमधून वीजपुरवठा केला जातो. गावातील डीपी वारंवार नादुरुस्त होत असून, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी तात्पुरती दुरुस्ती केली जात असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. सध्या संबंधित डीपी खुल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी विजेचा धक्का बसून जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने डीपीला सुरक्षा कवच देण्याची मागणीही होत आहे. ग्रामीण वायरमन शुभम शिंपी यांच्याकडून स्थानिक पातळीवर वीजपुरवठ्याचे कामकाज पाहिले जात असले, तरी आवश्यक कार्यवाहीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.

दहा दिवसांपूर्वी तक्रार करूनही डीपी बदलण्यात आली नाही आणि आता सलग दोन दिवस संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. तातडीने वीजपुरवठा सुरळीत करून नवीन डीपी बसवावी तसेच खुल्या डीपीला आवश्यक सुरक्षा कवच द्यावे, अशी मागणी सारबेटे बुद्रुक येथील ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *