
सानेनगरात अंगणात पाणी मारण्याच्या कारणावरून मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) अंगणात पाणी मारण्याच्या किरकोळ कारणावरून चौघांनी एका कुटुंबातील तिघांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची घटना शहरातील सानेनगर परिसरात २३ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, हिराबाई रमेश खैरनार (रा. वणी ता. धुळे, हल्ली मुक्काम नवागाम दिंडोरी, सुरत) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांच्या बहिणी अन्नपूर्णा रघुनाथ खैरनार व सासू दगुबाई पुनमचंद सोनवणे (दोघी रा. सानेनगर, अमळनेर) यांना २२ रोजी अंगणात पाणी मारण्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर राहणाऱ्या पुष्पाबाई जवाहरलाल सोनवणे व भारती समाधान मैराळे यांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर २३ रोजी हिराबाई खैरनार, त्यांचे पती रमेश खैरनार व मुलगी पूनम विनोद मोरे (रा. गांधलीपुरा) हे सानेनगर येथे अन्नपूर्णा खैरनार यांच्या अंगणात दुपारी दोन वाजता उभे होते. त्यावेळी पुष्पाबाई सोनवणे, भारती मैराळे, किशोर भिकन बिऱ्हाडे व दीपक चौधरी (रा. धुळे रोड) हे तेथे आले. त्यांनी शिवीगाळ करत वाद घालण्यास सुरुवात केली.
वाद वाढल्यानंतर किशोर बिऱ्हाडे याने हातातील काठीने हिराबाई, रमेश खैरनार व पूनम मोरे यांच्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. तसेच इतर तिघांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेले रघुनाथ खैरनार यांनाही आरोपींनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना डॉ. दिनेश पाटील यांच्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर फिर्यादींनी अमळनेर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११७(२), ११५(२), ३५१(२) व ३५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे व अशोक साळुंखे करीत आहेत.

Leave a Reply