
‘संसद रत्न’ पुरस्कारानिमित्त खासदार स्मिता वाघ यांचा सत्कार
कमाल विक्री किंमत धोरणाविरोधातील आंदोलनाबाबत ग्राहक पंचायतीने दिले निवेदन

जळगाव (प्रतिनिधी) प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खासदार स्मिता वाघ यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे जळगाव येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक हिताशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, विशेषतः कमाल विक्री किंमत (एमआरपी) धोरणाविरोधात सुरू असलेल्या राष्ट्रीय आंदोलनासंदर्भात खासदारांना निवेदन देण्यात आले.
प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार स्मिता वाघ यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात ॲड. भारती अग्रवाल, सतीश देशमुख, मकसूद बोहरी यांच्यासह ग्राहक पंचायतीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी खासदारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर २५ मे रोजी देशभरात सुरू करण्यात आलेल्या कमाल विक्री किंमत धोरणाविरोधातील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उत्पादनांवर कृत्रिमरीत्या वाढवण्यात येणाऱ्या कमाल विक्री किंमतीमुळे ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला. बाजारात अनेक वस्तूंवर उत्पादन खर्चाच्या तुलनेत जादा किंमत आकारली जात असल्याने सामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. ग्राहकांच्या हितासाठी केंद्र शासनाने कमाल विक्री किंमत निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, तसेच ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. खासदार स्मिता वाघ यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून शिष्टमंडळाच्या मागण्यांची दखल घेतली. आगामी संसद अधिवेशनात या प्रश्नावर आवाज उठवून ग्राहकांच्या न्याय्य मागणीसाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Leave a Reply