
अमळनेर तालुक्यात शैक्षणिक संस्थांमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा
कन्या शाळा, साने गुरुजी विद्या मंदिरासह मारवड महाविद्यालयात विविध उपक्रम; विद्यार्थ्यांना संविधानाच्या मूल्यांचे मार्गदर्शन

अमळनेर (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाहीची मूल्ये, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, या उद्देशाने अमळनेर तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळा, साने गुरुजी विद्या मंदिर आणि मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात संविधान वाचन, प्रतिज्ञा, विद्यार्थ्यांची भाषणे आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कन्या शाळेत २७ विद्यार्थिनींची संविधानावर भाषणे
खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेत सकाळ व दुपार विभागात संविधान दिन साजरा करण्यात आला. महामानवाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. मुख्याध्यापिका एस. एस. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपमुख्याध्यापक एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी पी. पी. जोशी, ज्येष्ठ शिक्षिका आर. एस. सोनवणे आणि शिक्षकेतर प्रतिनिधी शामभाऊ पवार उपस्थित होते.
प्रमुख वक्त्या वाय. एम. पाटील आणि मीनाक्षी पाटील यांनी संविधानाविषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थिनींचे प्रबोधन केले. विशेष म्हणजे तब्बल २७ विद्यार्थिनींनी संविधानावर भाषणे करून आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका सूर्यवंशी यांनी भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त झाले असून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही मूल्ये रुजविण्यात संविधानाचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींनी आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्यांचीही जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
उत्कृष्ट भाषण करणाऱ्या मयुरी महाजन, वैष्णवी पाटील, रुश्वी साळुंखे, नव्या पाटील आणि तनिष्का पाटील यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. व्ही. साबे आणि पी. एस. सराफ यांनी केले, तर टी. आर. चव्हाण व आर. एस. सोनवणे यांनी आभार मानले.
साने गुरुजी विद्या मंदिरात ‘मेरा घर संगम’मधून विविधतेत एकतेचा संदेश
साने गुरुजी विद्या मंदिरातही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘मेरा घर संगम’ या उपक्रमांतर्गत देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत भारतीय राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुणे, विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून केली.
हरियाणा, कर्नाटक, बिहार आणि तामिळनाडू येथून आलेल्या पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून संविधानातील मूल्ये आणि लोकशाहीचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. विविध राज्यांतील भाषा, उच्चार आणि संवादशैली यांचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या संवादातून संविधानातील ‘विविधतेत एकता’ या तत्त्वाची प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना घेता आली. यावेळी संस्थेचे सचिव संदीप घोरपडे, प्रभारी मुख्याध्यापक योगेश मोरे, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
मारवड महाविद्यालयात संविधान गौरव दिनानिमित्त प्रबोधन
ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी प्राचार्य डॉ. देसले यांनी संविधान दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतीय संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार प्रदान केले असून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचा प्रसार केला आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये कर्तव्यांबाबत जागरूकता निर्माण केली आहे. देशातील लोकशाही अधिक बळकट आणि टिकाऊ ठेवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सतीश पारधी यांनी सूत्रसंचालन केले. उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. डी. पाटील आणि डॉ. देवदत्त पाटील यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधानातील मूल्यांची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या तिन्ही शैक्षणिक संस्थांमधील उपक्रमांतून देण्यात आला.

Leave a Reply