भाजप प्रदेश कार्यकारिणीत अमळनेर तालुक्यातील दोघांची सरचिटणीसपदी लागली वर्णी

राजेश पांडे, भैरवी वाघ पलांडे यांचा समावेश

 

अमळनेर (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीची प्रदेश कार्यकारीणी जाहीर करण्यात आली आहे. यात अमळनेर तालुक्यातील दोघांची वर्णी लागली आहे. प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी राजेश पांडे आणि भैरवी वाघ पलांडे यांच्यावर सोपवली आहे. राजेश पांडे हे करणखेडा येथील सुपुत्र आहेत. भाजपात स्वकर्तुत्वाने व अभ्यासू वृत्तीने उच्चशिखरावर पोहोचलेले आहेत. त्यांची प्रदेश सरचिटणीस या अत्यंत महत्वाच्या पदावर वर्णी लागली आहे. तर भाजयुमोच्या प्रदेश चिटणीस असलेल्या भैरवी वाघ पलांडे यांची प्रदेश चिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. करणखेडा येथे सामान्य कुटुंबात जन्माला आलेले राजेश पांडे हे विद्यार्थी दशेपासून भाजप व संघ परिवाराशी जुडले असून चळवळीतुन त्यांचा उगम झाला आहे. सुरवातीला जळगाव विद्यापीठात काही वर्षे सिनेट सदस्य राहिल्यानंतर आपल्या कार्याची छाप त्यांनी पाडली. त्यानंतर ते पुणे येथे स्थायिक झाले. तेथेही पुणे विद्यापीठात सिनेट सदस्य म्हणून आपल्या कार्याची छाप त्यांनी पाडली. कालांतराने भाजपात सक्रिय झाल्यानंतर अनेक संघटनात्मक व महत्वाच्या जवाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या असून भाजपात सर्वच वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.नुकत्याच झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठी महत्वाची जबाबदारी सांभाळली असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक झाले.आता भाजपाने थेट प्रदेश सरचिटणीस या महत्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करून एकप्रकारे त्यांच्या कार्याचा सन्मानच केला आहे. एक सामान्य कार्यकर्ता प्रदेश पातळीवर पोहोचल्याने त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे. तसेच भैरवी वाघ या दिवंगत भाजपा नेते स्वर्गीय उदय वाघ व खासदार स्मिताताई वाघ यांच्या सुपुत्री असून त्यांनीही भाजयुमोपासून आपल्या राजकीय कार्याची सुरुवात केली आहे. प्रदेश चिटणीस असताना जवाबदारी उत्तम सांभाळत अनेक उपक्रमात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला. जळगाव जिल्हा दूध संघाच्या त्या मा.संचालिका असून युवती नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे.भाजप प्रदेश चिटणीसपदी त्यांना संधी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे स्वागत होत आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *