पावसाची दडी, महागाईची झळ; शेतकरी सापडले दुहेरी संकटात!

अमळनेर (प्रतिनिधी) : पावसाने गेल्या १५ ते १७ दिवसांपासून दडी मारल्याने चिमनपुरी, पिंपळे खुर्द-बुद्रुक आणि अटाळे परिसरातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने कापूस पिकाची वाढ खुंटत असून पानांवर लालसरपणा दिसून येत आहे. त्यामुळे कापसावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली असून उत्पादन घटण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

बाजरी आणि मका पिके सध्या कणीस भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत आहेत. या काळात दमदार पाऊस न झाल्यास दाणे भरण्यावर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी पिके उभी केली आहेत. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने केलेला खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना उत्पादनात घट झाल्यास आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. कृषी विभागाने तातडीने चिमनपुरी, पिंपळे खुर्द-बुद्रुक आणि अटाळे परिसरातील पिकांची पाहणी करून कापूस, बाजरी व मका उत्पादकांना आवश्यक मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

 

शेतीसोबत घरखर्चाचेही गणित बिघडले

 

शेतीचा वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे खाद्यतेल, साखर, उडीद डाळ, मूग डाळ यांसह किराणा वस्तूंच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी कुटुंबांचे घरखर्चाचे गणितही विस्कळीत झाले आहे. सिलिंडर, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, मुलांचा शिक्षण खर्च आणि दैनंदिन गरजांचा वाढता खर्च यामुळे आर्थिक ताण अधिकच वाढला आहे. “शेतमालाला भाव नाही; शेवटी परमेश्वराच्या भरवशावरच  जगतो,” अशी व्यथा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी युवराज पाटील यांनी व्यक्त केली. पावसाची प्रतीक्षा आणि वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *