
पालिकेकडून ४७ लाखांची रॉयल्टी वसुली; तहसील विभागानेही थकबाकी भरावी
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील विकासकामांवर आकारण्यात येणारी गौण खनिज रॉयल्टी तहसील प्रशासनाने थेट पालिकेत जाऊन तब्बल ४७ लाख रुपये वसूल केली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस सुरू असलेल्या वसुली मोहिमेत ही मोठी कारवाई मानली जात असताना, दुसरीकडे तहसील विभागानेही पालिकेची थकीत देणी तत्काळ भरावीत, अशी मागणी माजी नगरसेवक मुन्ना शर्मा यांनी केली आहे.
शहरात सुरू असलेल्या रस्ते, बांधकाम, खोदकाम तसेच इतर विकासकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या गौण खनिजांवर शासनाकडून रॉयल्टी आकारली जाते. ही रक्कम तहसील कार्यालयाकडे जमा करणे बंधनकारक असते. मार्च अखेर जवळ आल्याने महसूल विभागाकडून वसुलीला वेग देण्यात आला असून तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी स्वतः पालिकेत जाऊन ही ४७ लाख रुपयांची रक्कम वसूल केली. दरम्यान, तहसील कार्यालय आणि धान्य गोदाम यांच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी पालिकेकडे २ लाख ८६ हजार ३३८ रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. पालिकेकडूनही सध्या वसुली मोहीम राबवली जात असून आर्थिक शिस्त राखण्यासाठी सर्व विभागांनी आपापली देणी वेळेत भरणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. पालिकेची किमान ९० टक्के वसुली झाल्यासच शहरातील विकासकामांना गती मिळू शकते. त्यामुळे तहसील प्रशासनाने जशी पालिकेकडून रॉयल्टी वसूल केली, तशीच जबाबदारी पार पाडत पालिकेची थकबाकीही तातडीने भरावी, अशी मागणी मुन्ना शर्मा यांनी केली आहे.

Leave a Reply