सत्तेत येऊन सहा महिने झोपा काढणाऱ्या उपनगराध्यक्षांना टाक्या साफच झाल्या नसल्याचा साक्षातकार झाला कसा?

खोटं बोला, पण रेटून बोला! स्टंटबाज उपनगराध्यक्षांचा जितेंद्र ठाकूरांकडून जाहीर पंचनामा

“खोटं बोलून प्रसिद्धी? २०११– १४ मध्येच टाक्या स्वच्छ – विरोधकांडून पलटवार”

 

अमळनेर (प्रतिनिधी)  पाण्याच्या टाकीत उतरून व्हिडिओबाजी करणारे उपनगराध्यक्ष प्रशांत निकम हे जनतेची दिशाभूल करणारे ‘स्टंटबाज’ आहेत. २४ वर्षांपासून टाक्या साफ झाल्या नसल्याचा जावईशोध लावून “सत्ताधाऱ्यांच्या जुन्या चुका आम्ही दुरुस्त करतोय,” अशी बतावणी करणाऱ्या निकम यांनी आधी मागील सत्ताधाऱ्यांचा इतिहास आणि वस्तुस्थिती उघड्या डोळ्यांनी समजून घ्यावी. सत्तेत येऊन सहामहिने झोपलेल्या निकम यांनी शहर विकास आघाडीच्या मोर्चाच्या इशाऱ्यानंतर स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठीच हा सारा ‘स्टंट’ रचल्याचा घणाघात  जितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.

अमळनेर शहर विकास आघाडीने शहरात होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्या संदर्भात २२ जून रोजी मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्रशासनाने मोर्चा न काढता चर्चेसाठी बोलवले होते. कायदा, सुव्यवस्था आणि शहराचा पाणीप्रश्न लक्षात घेता मोर्चा तूर्तास स्थगित ठेवून चर्चेसाठी होकार दिला. मात्र सत्ताधारी उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी, “गेल्या २२ ते २४ वर्षांपासून अमळनेर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची स्वच्छताच केली गेली नसल्याने यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून यामुळेच शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे,” असा जावईशोध लावून “आतापर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी केले तरी काय?” असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्टंटबाजी करून आगपाखड करण्याचा केविलवाणा प्रकार करत आपल्याच चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. “शहर विकास आघाडीने मोर्चाचा इशारा दिल्यावर ९ जानेवारी २०२६ रोजी सत्तेवर आल्यापासून तुम्ही काय झोपा काढत होते?” असा खडा सवाल करत ठाकूर यांनी लोकांची दिशाभूल करणाऱ्या निकम यांच्या खोटारडेपणाचा जाहीर पंचनामा करून स्टंटबाज उपनगराध्यक्षांचा बुरखा फाडला आहे.

 

उघडा डोळे आणि पहा पालिकेचा रेकॉर्ड

 

अमळनेर शहरात सध्या एकूण ७ पाण्याच्या टाक्या आहेत. १९९८ मध्ये जीवन प्राधिकरणाने पालिकेकडे ३ टाक्या हस्तांतरित केल्या होत्या. यामध्ये झामी चौक टाकी, कोर्टामागील टाकी आणि लालबाग टाकीचा समावेश होता. तर निकम म्हणतात की २४ वर्षांत काहीच झाले नाही; पण त्यांना माहिती नसेल तर त्यांनी पालिकेचे रेकॉर्ड तपासावे. २७ डिसेंबर २०११ ते ५ जुलै २०१४ या कार्यकाळात  जयश्रीताई अनिल पाटील या नगराध्यक्ष असताना आणि सोमनाथ शेटे हे तत्कालीन मुख्याधिकारी असताना, नागरिकांच्या जिवाशी खेळ न करता सर्व टाक्यांची अत्यंत कडक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळी या तिन्ही टाक्यांमधून अनेक ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे २४ वर्षांचा निकम यांचा दावा पूर्णपणे फोल आणि धादांत खोटा आहे.

 

नव्या टाक्यांचे उद्घाटन जयश्रीताईंच्याच हस्ते!

 

जयश्रीताई पाटील यांचा २७ डिसेंबर २०११ ते ५ जुलै २०१४ हा कार्यकाळ राहिला आहे. या कार्यकाळात त्यांनी शहरात ४ नवीन टाक्यांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यात ढेकूरोडवरील लक्ष्मीनगर टाकी, पैलाड टाकी,रामवाडी,मुंदडानगरची टाकी या चारही नवीन टाक्यांचे उद्घाटन आणि लोकार्पण १ मार्च २०१४ रोजी माजी खासदार ए. टी. पाटील यांच्यासह नगराध्यक्षा जयश्रीताई पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. निकम यांनी जर डोळे उघडून पाहिले, तर आजही त्या टाक्यांवर उद्घाटनाच्या पाट्या पाहायला मिळतील. निकम यांनी त्या पाट्या जाऊन वाचाव्यात, म्हणजे कोणाच्या काळात काय काम झाले याचे ज्ञान त्यांना येईल. याशिवाय, प्रशासकीय काळात प्रशासक प्रशांत सरोदे असताना तांबेपुऱ्यातील पाचवी टाकीही उभी राहिली.

 

मोर्चाला घाबरून नवा स्टंट?

 

         शहरात दूषित, गढूळ पाणी येत असल्याने आणि पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने आम्ही पालिकेवर मोर्चा काढणार होतो. आम्ही सत्ताधाऱ्यांना सहकार्य करत मोर्च्याच्या तोंडावर ८ दिवसांची मुदत दिली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीला मान दिला. कारण आम्हाला पाण्याचे घाणेरडे राजकारण करायचे नाही. पण, या मोर्चाला घाबरून उपनगराध्यक्षांनी टाकीत उतरण्याचा नवा ‘स्टंट’ सुरू केला आहे. “६ महिने सत्ता हातात असताना तुम्ही काय झोपा काढत होते का? मोर्चा जाहीर झाल्यावरच तुम्हाला टाक्यांची आठवण कशी आली?”, असा सवालही ठाकूर यांनी उपस्थित केला आहे.

 

इतर नगराध्यक्षांना व प्रशासक यांना जाब विचारण्याचे धाडस दाखवा

 

सन २०१४ नंतर जयश्रीताईंचा नगराध्यक्षपदाचा काळ संपल्यानंतर पुढील काळात माजी आमदार शिरीष चौधरी यांची सत्ता होती, माजी आमदार साहेबराव पाटील यांची सत्ता होती. या माजी नगराध्यक्षांच्या व प्रशासकीय काळात टाक्या का साफ झाल्या नाहीत, याचा जाब विचारण्याचे धाडस प्रशांत निकम यांच्यात आहे का? असे आव्हान देत त्यांनी इतरांवर चिखलफेक करण्याऐवजी स्वतः आत्मपरीक्षण करावे आणि स्वतःच्या अपयशाचे उत्तर शोधावे. निवडणुकीत जशी लोकांची दिशाभूल केली, तसाच प्रकार आताही सुरू आहे; पण अमळनेरची जनता आता तुमच्या या स्टंटबाजीत अडकणार नाही.

        नैतिकतेची थोडी जरी चाड असेल, तर लोकांच्या जिवाशी खेळणे बंद करा, खोटे बोलून दिशाभूल करणे थांबवा आणि तात्काळ राजीनामा द्या!, अशी मागणीही ठाकूर यांनी केली आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *