
महापुराने १,९७९ मालमत्तांचे नुकसान, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी १५ दिवसांची प्रतीक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) ३१ जुलै रोजी बोरी नदीला आलेल्या विक्राळ महापुराने अमळनेर शहराला मोठा फटका बसला असून, आतापर्यंत १,८७१ घरे आणि १०८ दुकाने, अशा एकूण १,९७९ मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून समोर आले आहे. त्याचबरोबर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा कणा असलेली ५०० मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी महापुरात वाहून गेल्याने शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, तो पूर्ववत होण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महापुरात वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मुंबईहून ५० नवीन पाइप मागविण्यात आले आहेत. मात्र, बोरी नदीवरील पुलाच्या पादचारी मार्गावरून पाइप जोडताना तांत्रिक अडचणी येत असल्याने दोन स्वतंत्र पथकांमार्फत युद्धपातळीवर काम सुरू आहे. भविष्यात पाइपलाइनला गळती होऊ नये किंवा पाण्याच्या दाबामुळे ती पुन्हा तुटू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्यात आली आहे. दुसऱ्या लाईनवरील उपलब्ध जुन्या जलवाहिन्या परस्पर जोडून विविध पाण्याच्या टाक्या भरण्याचे काम सुरू असून, अवघ्या २४ तासांत पर्यायी पाइपलाइनचे जाळे तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून नागरिकांना केवळ पिण्यासाठी आणि अत्यावश्यक गरजांसाठी पाणीपुरवठा केला जाणार असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या वेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक अनिल महाजन, नावेद शेख तसेच नगरपरिषदेचे अभियंता सत्येम पाटील उपस्थित होते.
नवीन जलवाहिनीसाठी ९६ लाखांचा खर्च
महापुरात वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या पुनर्बांधणीसाठी सुमारे ९६ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन विकास समिती (डीपीडीसी) तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
आतापर्यंत १,९७९ पंचनामे पूर्ण
महापुरामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले असून, आतापर्यंत १,८७१ घरांचे आणि १०८ दुकानांचे, असे एकूण १,९७९ पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना शासनाच्या निकषांनुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
पिंपळे नाल्यावरील अतिक्रमणांची होणार चौकशी
महापुराच्या पार्श्वभूमीवर पिंपळे नाल्यावर झालेल्या अतिक्रमणांचा मुद्दाही पत्रकार परिषदेत उपस्थित झाला. संबंधित परिसराचा पूर्वीचा सर्व्हे आणि ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या नव्या सर्वेक्षणाची तुलना करून अतिक्रमणांसाठी जबाबदार असलेल्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार संबंधित ठेकेदार आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
नगरसेवक व सामाजिक संस्थांना आवाहन
“सध्या शहरात नागरिकांना पाणी पुरवठा करण्याबाबत नगरसेवक व सामाजिक संस्थांना आवाहन केले आहे. अतिक्रमण काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास करून मग निर्णय घेण्यात येईल.”
— डॉ. परीक्षित बाविस्कर, नगराध्यक्ष, अमळनेर नगरपरिषद

Leave a Reply