
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा
अमळनेर (प्रतिनिधी) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्येष्ठ नागरिक महिला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार (दि. ३ ऑगस्ट २०२६) रोजी संघाच्या अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. वार्षिक कामकाजाचा आढावा, आर्थिक अहवाल, विविध ठरावांना एकमुखी मंजुरी, मनोरंजनात्मक स्पर्धा, मान्यवरांचा सत्कार आणि मैत्री दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमामुळे सभेला विशेष रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संघाच्या उपाध्यक्षा वसुंधरा लांडगे यांनी साने गुरुजींची प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या सचिव गायत्री भदाणे यांनी केले. कोषाध्यक्षा उषा पवार यांनी वार्षिक आर्थिक जमाखर्च सभेपुढे सादर केला. अध्यक्षा प्रा. शीला पाटील यांनी संघाच्या वर्षभरातील कामकाजाचा व आगामी उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर कार्यकारिणी व सभासदांनी सभेतील सर्व विषयांना एकमुखाने मंजुरी दिली. माजी अध्यक्षा कमल आक्का यांनी आभार प्रदर्शन केले.
सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या विविध मनोरंजनात्मक स्पर्धांना सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उखाणे स्पर्धेत प्रतिभा शिसोदे व सुषमा मोरणकर यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळविला, तर विद्या अशोक पाटील यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. वन मिनिट शो स्पर्धेत दीपा सोनवणे, वंदना मोरे आणि सुशीला बाविस्कर यांनी प्रथम क्रमांक मिळविला, तर जयश्री महाजन व प्रतिभा शिसोदे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. विजेत्या स्पर्धकांना संचालकांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी संघासाठी देणगी दिल्याबद्दल माधुरी प्रमोद पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुरेखा बाविस्कर तसेच जवखेडे येथील महिला संघाच्या अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलका गोसावी, सुदर्शना पाटील, अलका रतन पाटील, सुनंदा चौधरी, प्रा. शैलजा माहेश्वरी, आशा भदाणे, रत्ना भदाणे, सुरेखा बाविस्कर, छाया पाटील आणि अनिता बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार, मैत्री दिनानिमित्त माधुरी प्रमोद पाटील यांनी दिलेल्या चॉकलेटचे वितरण आणि मधुर स्वरातील पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री भदाणे यांनी केले. या वार्षिक सर्वसाधारण सभेला संघाच्या सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.

Leave a Reply