
जागतिक स्तनपान सप्ताहातच अमळनेरमधील हिरकणी कक्षांची दुरवस्था उघड
अमळनेर (प्रतिनिधी) देशभर १ ते ७ ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा होत असताना अमळनेर शहरातील स्तनदा मातांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या हिरकणी कक्षांची दुरवस्था समोर आली आहे. बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील हिरकणी कक्ष केवळ नावालाच सुरू असल्याचे, तर अनेक शासकीय कार्यालयांमध्ये ही सुविधा केवळ कागदोपत्रीच असल्याचे वास्तव समोर आले आहे. परिणामी स्तनदा मातांना पंखा, पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि गोपनीयतेचा अभाव असलेल्या ठिकाणी बालकांना स्तनपान करावे लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अमळनेर बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरील हिरकणी कक्षांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी नियमित स्वच्छता होत नाही. कक्षांमध्ये पंख्याची व्यवस्था नसल्याने उकाड्यात माता आणि बालकांना त्रास सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. तसेच बसण्यासाठी पुरेशी व स्वच्छ आसनव्यवस्था नसल्याने या कक्षांचा अपेक्षित उपयोग होत नाही. त्यामुळे अनेक महिलांना उघड्यावर किंवा अयोग्य ठिकाणी बालकांना स्तनपान करण्याची वेळ येत असल्याचे महिलांनी सांगितले.
दुसरीकडे, अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष असल्याची नोंद असली तरी प्रत्यक्षात स्वतंत्र कक्ष उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे शासनाच्या महिला व बालकल्याण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जन्मानंतरच्या पहिल्या सहा महिन्यांत बाळासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आणि संपूर्ण आहार आहे. अशा परिस्थितीत मातांना सन्मानाने, सुरक्षित आणि गोपनीय वातावरणात स्तनपान करता यावे, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र जागतिक स्तनपान सप्ताहातच हिरकणी कक्षांची दुरवस्था समोर आल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागरिक, महिला प्रवासी आणि सामाजिक संघटनांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक तसेच सर्व शासकीय कार्यालयांमधील हिरकणी कक्ष तातडीने कार्यान्वित करून स्वच्छता, पंखा, पिण्याचे पाणी, आरामदायी आसनव्यवस्था, आवश्यक साहित्य आणि नियमित देखभाल सुनिश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने सर्व हिरकणी कक्षांची पाहणी करून निष्क्रिय सुविधा तातडीने सुरू कराव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी होत आहे.
प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासली जाईल
“हिरकणी कक्ष हा स्तनदा माता व लहान बालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे. अमळनेरमधील हिरकणी कक्षांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती तपासली जाईल. संबंधित विभागाच्या निदर्शनास आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची बाब आणली जाईल. मातांना सुरक्षित व सन्मानपूर्वक स्तनपानाची सुविधा मिळावी, यासाठी महिला व बाल विकास विभाग कटिबद्ध आहे.”
– प्रेमलता पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, अमळनेर
सुविधा मिळणे प्रत्येक स्तनदा मातेचा हक्क
“जागतिक स्तनपान सप्ताहातच हिरकणी कक्षांची दुरवस्था समोर येणे दुर्दैवी आहे. बसस्थानक, रेल्वे स्थानक व शासकीय कार्यालयांतील हिरकणी कक्ष तातडीने कार्यान्वित करून स्वच्छता, पिण्याचे पाणी, पंखा, बसण्याची व्यवस्था व नियमित देखभाल सुनिश्चित करावी. ही सुविधा प्रत्येक स्तनदा मातेचा हक्क आहे.”
– स्वप्ना विक्रांत पाटील, सदस्या, त्रिवेणी महिला मंडळ, अमळनेर

Leave a Reply