
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जोशी दांपत्याचा मायेचा हात; ‘हयात असेपर्यंत साथ देणार
अमळनेर (प्रतिनिधी) दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक मदतीसोबतच मायेचा आधार मिळावा, या भावनेतून गणेश हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी जोशी दांपत्याने सामाजिक बांधिलकी जपत आर. के. नगर येथील स्व. शंकरआप्पा रायसिंग निवासी मतिमंद विद्यालयातील १५ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि वर्षभराच्या गणवेशाचा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
महर्षी वाल्मिक आदिवासी बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित या विद्यालयाचे कार्य संस्थापक अध्यक्ष डॉ. भगवानजी तलवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी जोशी यांनी केवळ एकवेळची मदत न करता त्यांच्या शिक्षण, पोषण आणि आवश्यक गरजांसाठी सातत्याने सहकार्य करण्याचा संकल्प केला आहे. यासंदर्भात संस्था समन्वयक ऋषिकेश जाधव व कला शिक्षक अजय पाटील यांना आपल्या कार्यालयात बोलावून डॉ. प्रसन्न जोशी व डॉ. उर्वी जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपली भूमिका स्पष्ट केली. “विद्यालयातील या विद्यार्थ्यांना आम्ही एक प्रकारे दत्तकच घेत आहोत. आम्ही हयात असेपर्यंत त्यांच्या पालन-पोषण, शिक्षण, संगोपन किंवा कोणत्याही आवश्यक गरजेसाठी मदत लागल्यास सर्वतोपरी सहकार्य करू,” असा शब्द त्यांनी दिला. जोशी दांपत्याच्या या सामाजिक उपक्रमाचे संस्था पदाधिकारी, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने कौतुक करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे यावे, असा सकारात्मक संदेशही या उपक्रमातून मिळत आहे.
आर्थिक मदतीसोबत आपलेपणाची जाणीव
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देणारे अनेक जण असले, तरी त्यांच्या दैनंदिन गरजा, पोषण आणि शैक्षणिक साहित्याची जबाबदारी सातत्याने स्वीकारण्याचा हा उपक्रम विशेष ठरला आहे. ‘समाजाने आपल्याला दिले आहे, त्यातील काहीतरी समाजाला परत देणे ही आपली जबाबदारी आहे,’ या भावनेतून जोशी दांपत्याने घेतलेला हा पुढाकार संवेदनशीलतेचा आदर्श ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आपलेपणा आणि आधाराची भावना मिळणार आहे.

Leave a Reply