
कानबाई मातेचा जयघोष, मिरवणूक, फुगडी अन् पाण्याच्या फवाऱ्यांनी रंगला उत्सव
अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेशातील लोकजीवनाशी अतूट नाते असलेल्या कानबाई मातेच्या उत्सवाने अमळनेर शहरात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण केले. शहरातील विविध भागांत कानबाई मातेची स्थापना व पूजन केल्यानंतर पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांचा गजर, कानबाई मातेचा जयघोष, महिलांची फुगडी, तरुणाईचे नृत्य आणि पाण्याच्या फवाऱ्यांमुळे पैलाड परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.
पैलाड परिसरात महंत हरिहरानंद गिरि (दादू महाराज भगत) यांच्या निवासस्थानी कानबाई मातेची भक्तिमय वातावरणात स्थापना करण्यात आली. त्यानंतर मातेची वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत महिला-पुरुष, तरुणाई, भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
महिलांनी पारंपरिक पद्धतीने फुगडी खेळत उत्सवाचा आनंद लुटला, तर तरुणाईने नृत्य करत जल्लोष केला. भाविकांकडून ‘कानबाई मातेचा जयघोष’ करण्यात येत होता. ठिकठिकाणी पाण्याचे फवारे उडवून उत्सवात आणखी रंगत आणण्यात आली.
पैलाड चौकात कानबाई-रानबाईच्या मिरवणुकांची भेट
पैलाडच्या मुख्य चौकात शहरातील विविध भागांतून निघालेल्या कानबाई-रानबाईच्या मिरवणुका एकमेकींना भेटल्या. या पारंपरिक भेटीच्या क्षणी भाविकांनी मोठ्या उत्साहात जयघोष करत आनंद व्यक्त केला. विविध मिरवणुका एकत्र आल्याने परिसरात भक्ती, उत्साह आणि खानदेशी लोकपरंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. या मिरवणुकीत दादू महाराज भगत यांचे गुरुवर्य १००८ महामंडलेश्वर पार्वती आई परशुराम जोगी नंदगिरी जी, आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या उपाध्यक्षा, धुळे यांचीही उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीमुळे धार्मिक वातावरणाला अधिक आध्यात्मिक रंग प्राप्त झाला. यावेळी अनेक भाविक, नागरिक, मित्रपरिवार आणि मान्यवरांनी दादू महाराज भगत यांची भेट घेत कानबाई माता उत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, जितेंद्र ठाकूर, दुर्गेश पाटील, भूषण लोहार, गणेश पाटील, चेतन पाटील, दर्शन पाटील, मोहित शिंदे आणि कुशल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चोपडा नाक्यावरही कानबाई माता उत्सवाची भक्तिमय सांगता
दरम्यान, शनीपेठ परिसरातील चोपडा नाका येथेही ‘श्रावणीय कानबाई माता उत्सव’ मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. उत्सवानिमित्त रोट पूजन, भाजी-भाकरीचा नैवेद्य, गहू दळणे, मातेचा अभिषेक, नैवेद्य, रोट पूजन, महाआरती तसेच जागरणाचे आयोजन करण्यात आले. उत्सवाच्या सांगतेनिमित्त कानबाई मातेची भव्य विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मातेचा जयघोष केला.
खानदेशच्या लोकपरंपरेतील कानबाई मातेचे महत्व
कानबाई मातेचा उत्सव हा जळगाव, धुळे व नंदुरबारसह संपूर्ण खानदेशच्या लोकजीवनाशी जोडलेला महत्त्वपूर्ण पारंपरिक उत्सव आहे. अनेक पिढ्यांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाच्या निमित्ताने घराघरांत नातेवाईक, आप्तेष्ट आणि माहेरवाशिणी एकत्र येतात. कानबाई मातेला सुख-समृद्धी, सौख्य, शांती आणि कुटुंबाच्या कल्याणाचे प्रतीक मानले जाते.
महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, पारंपरिक गीते, फुगडी, नृत्य आणि सामूहिक उत्सव हे कानबाई उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कानबाई-रानबाईच्या मिरवणुकांची परस्पर भेट ही या लोकपरंपरेतील विशेष बाब असून, त्यातून सामाजिक एकोपा आणि नात्यांची वीण अधिक घट्ट होताना दिसते. दादू महाराज भगत यांच्या निवासस्थानी तसेच शहरातील विविध भागांत झालेल्या कानबाई मातेच्या मिरवणुकांमुळे श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण अमळनेर शहर ‘कानबाई मातेच्या जयघोषाने’ दुमदुमून गेले.

Leave a Reply