ईद-उल-अजहा उत्साहात साजरी; अमळनेरमध्ये सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश

अमळनेर (प्रतिनिधी) शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि सामाजिक सलोख्याच्या भावनेत साजरा करण्यात आला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली होती. हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता, ऐक्य, प्रगती आणि सर्वधर्म समभावासाठी विशेष प्रार्थना केली.

अमळनेर शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहेब यांच्या नेतृत्वाखाली ईदची नमाज अदा करण्यात आली. नमाजपूर्वी त्यांनी समाजात बंधुभाव, शांतता, परस्पर सहकार्य आणि मानवतेचे महत्त्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन केले. ईद-उल-अजहा हा त्याग, समर्पण आणि प्रेमाचा संदेश देणारा सण असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांनी ईदगाह मैदानावर उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे सर्व कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडले. नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छांची देवाणघेवाण केली. अमळनेर शहरातील सामाजिक ऐक्य आणि सलोख्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. अनेकांनी कब्रिस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्यासाठी प्रार्थना केली. “नाद विसरून भेदाचा, संदेश देऊ प्रेमाचा…” हा अमळनेरकरांनी दिलेला सलोख्याचा संदेश आजच्या काळात समाजासाठी प्रेरणादायी आणि अत्यंत आवश्यक असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *