बेकायदेशीर नळ कनेक्शन प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, मुख्याधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेचे सर्वत्र स्वागत

अमळनेर (प्रतिनिधी) नगरपालिकेच्या गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून मुख्य पाईपलाईन फोडून बेकायदेशीर नळ कनेक्शन घेण्यात आल्याप्रकरणी खाजगी प्लम्बर, पालिकेचा कर्मचारी तसेच गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे शहरात त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गांधली येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील सुपरवायझर बारकू कृष्णा सोनवणे यांनी अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, दि. ६ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जलकुंभाच्या मुख्य आउटलेटमधून कोणतीही शासकीय परवानगी न घेता तसेच कोणतीही अधिकृत पावती न फाडता एक इंची नळ कनेक्शन काढण्यात आले होते. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या मालमत्तेचे नुकसान होऊन शासकीय पाण्याची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणाची चौकशी केली असता खाजगी प्लम्बर जावेद कमरुद्दीन शेख तसेच पालिकेचे कर्मचारी कमरुद्दीन शेख हुसेन, दोघेही मेहतर कॉलनी येथील रहिवासी असल्याचे समोर आले. त्यांनी संगनमताने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मुख्याधिकाऱ्यांनी राजेंद्र काशिनाथ हडपे (रा. अयोध्यानगर) यांना संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हडपे यांनी आदेश असूनही गुन्हा दाखल करण्यास नकार देत टाळाटाळ केल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्याधिकारी शिंदे यांनी कर्तव्यदक्षता दाखवत हडपे यांच्याविरुद्धही कारवाईचे आदेश दिले.

यानुसार जावेद शेख व कमरुद्दीन शेख हुसेन यांच्याविरुद्ध शासकीय पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण करणे, चोरी करणे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे या आरोपांखाली भारतीय न्याय संहिता कलम ६२ तसेच सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ मधील कलम ३ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तर राजेंद्र हडपे यांच्याविरुद्ध वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *