पुण्यातील राज्यस्तरीय अंडी उबवणी प्रशिक्षणात डॉ. दिपक पाटील यांचा गौरव

एक दिवसाच्या पिलांचे यशस्वी लसीकरण प्रात्यक्षिक; प्रमाणपत्र देऊन सन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी (पुणे) येथे ११ ते १५ मे दरम्यान अंडी उबवणी व पक्षी संगोपन विषयावर पाच दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. महाराष्ट्रातील सुमारे ७० प्रशिक्षणार्थींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. यात डॉ. दिपक पाटील यांचा गौरव करण्यात आला.

कार्यशाळेत कुक्कुटपालन विकास सुधारित अंडी उबवणी ट्रेनर तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक औताडे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दिपाली शिरसागर यांनी प्रशिक्षणार्थींना अंडी उबवणीपासून एक दिवसाच्या पिलांचे लसीकरण, संगोपन, विविध वयोगटातील पक्ष्यांना देण्यात येणाऱ्या लसी, त्यांचे आरोग्य व्यवस्थापन तसेच कुक्कुटपालन व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. खानदेशातील गावरान कोंबडी, विशेषतः सातपुडा भागातील प्रजातींपासून विशेष ब्रीड विकसित करून शेतकऱ्यांना जोडधंद्यातून आर्थिक लाभ मिळवून देण्यावरही भर देण्यात आला. लघुउद्योगापासून मोठ्या उद्योगापर्यंत कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबी प्रशिक्षणार्थींना समजावून सांगण्यात आल्या. तसेच अंडी व कोंबडीजन्य पदार्थांचे मानवी आरोग्यातील महत्त्वही स्पष्ट करण्यात आले.

प्रशिक्षणादरम्यान आधुनिक स्क्रीन सादरीकरणासह प्रत्यक्ष अंडी उबवणी केंद्रात प्रात्यक्षिके घेण्यात आली. एक दिवसाच्या पिलापासून ते दीड वर्षांच्या पक्ष्यांपर्यंत लसीकरणाची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणात अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील पशुधन पर्यवेक्षक तथा माजी सभापती डॉ. दिपक पंढरीनाथ पाटील यांनी सहभाग घेत एक दिवसाच्या पिलांचे यशस्वी लसीकरण प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समारोप कार्यक्रमात विशेष प्राविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समारोप कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग पुणे डॉ. जयंत माहोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. दिपक पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. दिपक औताडे, डॉ. दिपाली शिरसागर आणि वरिष्ठ लिपिक पंकज शिंदे उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान तुषार भंडांगे आणि तन्मय पाषाणकर यांनी प्रशिक्षणार्थींना सहकार्य केले. डॉ. दिपक पाटील यांच्या यशाबद्दल डॉ. वाय. आर. सूर्यवंशी (निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, अमळनेर), डॉ. रवींद्रनाथ निमसे (पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग प्रमुख, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. एल. आर. धोंडे पाटील, डॉ. प्रतिभा कोरे (विशेष सर्जन, पशु उपायुक्तालय नाशिक) तसेच डॉ. प्रियंका झोपुडकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *