
“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” जयनिल फाउंडेशनचा अमळनेरमध्ये हरित संकल्प
अमळनेर (प्रतिनिधी) पर्यावरण संवर्धनाचा संदेश केवळ घोषणांपुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवत जयनिल फाउंडेशनच्या वतीने अमळनेर शहरात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात शहर अधिक हिरवेगार व्हावे, पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि भावी पिढीसाठी स्वच्छ व निरोगी वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने फाउंडेशनने शेकडो वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.
या अभियानाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” हा निर्धार. अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते; मात्र त्यानंतर झाडांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन जयनिल फाउंडेशनने प्रत्येक लावलेल्या वृक्षाची नियमित देखरेख करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक झाडाला ट्री गार्ड बसविणे, वेळोवेळी खत देणे, आवश्यकतेनुसार पाणी उपलब्ध करून देणे तसेच झाडे मोठी होईपर्यंत सातत्याने त्यांची निगा राखण्याची जबाबदारी फाउंडेशनने स्वीकारली आहे. याबाबत जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “पर्यावरण वाचवायचे असेल तर केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर प्रत्येक झाड जगले पाहिजे. आमचा भर फक्त लागवडीवर नसून वृक्षसंवर्धनावर आहे. या पावसाळ्यात शहरात जास्तीत जास्त झाडे लावून अमळनेर अधिक हिरवेगार करण्याचा आमचा संकल्प आहे.” यावेळी त्यांनी नागरिकांनाही पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे आणि त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी. प्रत्येक जिवंत राहिलेले झाड हे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या वृक्षारोपण उपक्रमात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील आणि पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जयनिल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे शहरभरातून स्वागत होत असून, “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा संदेश देणारा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply