
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; प्रांत कार्यालयावर मोर्चा
अमळनेर (प्रतिनिधी) सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवित अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देऊन आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला तसेच केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
या मोर्चादरम्यान आंदोलकांनी सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध केला. ही कारवाई लोकशाहीला काळिमा फासणारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच नीट परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि शिक्षणाचा वाढता खर्च या गंभीर प्रश्नांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला.
महाविकास आघाडीच्या वतीने या सर्व मुद्द्यांवर शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. शासन जनतेच्या प्रश्नांबाबत संवेदनशील नसल्याने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, बी. के. सूर्यवंशी, धनगर दला पाटील, अरुण देशमुख, संदीप घोरपडे, डॉ. रवींद्र पाटील, शरद पाटील, प्रकाश सोनवणे, शिवदास शेटे, दिलीप वानखेडे, नितीन निळे, देवेंद्र देशमुख, चंद्रशेखर भावसार, वासुदेव पवार, मोहन भोई, सतीश देशमुख, दर्शना पवार, कन्हैय्या कपडे, बन्सीलाल भागवत, पी. वाय. पाटील, डी. वाय. पाटील, प्रा. अशोक पवार, प्रा. गणेश पवार, ॲड. शिवकुमार ससाणे, मसूद पठाण, राजेंद्र पाटील आणि अनंत निकम यांच्यासह विविध पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा प्रांत कार्यालयाकडे रवाना होण्यापूर्वी तहसील कार्यालयाबाहेर सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत विविध लोकहिताच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यानंतर प्रांत अधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करून आंदोलनाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply