
अमळनेरमध्ये संत सखाराम महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी; आज अक्षय तृतीयेपासून उत्सवाला होणार प्रारंभ
अमळनेर (प्रतिनिधी) यंदाही विठ्ठल-रुक्मिणी संस्थान, अमळनेर-पंढरपूर यांच्या वतीने श्री संत सखाराम महाराज यांचा वार्षिक यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यासाठी संस्थानतर्फे व्यापक तयारी करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संत सखाराम महाराज यात्रोत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. भावी या यात्रा उत्सवाची उत्सुकतेने वाट पाहतात. आज दि. १९ एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर संस्थानचे गादीपुरुष परमपूज्य संत श्री प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत स्तंभारोपण व ध्वजारोहण समारंभ होऊन यात्रोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. सकाळी ९ वाजता नदीपात्रात लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यानंतर प्रसाद महाराजांच्या हस्ते उपस्थितांना यात्रोत्सवाचे निमंत्रण देण्यात येणार असून नारळ व प्रसादाचे वितरणही केले जाणार आहे.
यात्रोत्सवाच्या पुढील कार्यक्रमांमध्ये दि. २६ एप्रिल रोजी मोहन महाराज बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होणार आहे. त्यानंतर दि. २७ एप्रिल रोजी वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीच्या निमित्ताने सायंकाळी भव्य रथोत्सव पार पडणार आहे. तसेच दि. १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेला सकाळी ६ वाजल्यापासून पारंपरिक पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यानच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक व कीर्तन-भजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून नदीपात्रात भव्य यात्रोत्सवाची रेलचेल अनुभवायला मिळणार आहे. या यात्रोत्सवाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply