
अमळनेरमध्ये काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ६०० कार्यकर्त्यांची उपस्थिती
अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्रभर सुरू असलेल्या काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत १७ एप्रिल २०२६ रोजी अमळनेर येथे गलवाडे रोडवरील अंबिका मंगल कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या कार्यक्रमाला सुमारे ५५० ते ६०० जुने-नवे काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निरीक्षकांचा औपचारिक सत्कार करण्यात आला. प्रस्ताविकात काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत केशव सूर्यवंशी यांनी ‘संघटन सृजन अभियानाचा’ उद्देश स्पष्ट करताना संघटनेचा सखोल आढावा घेणे, आवश्यक तेथे बदल करणे आणि संघटना अधिक कृतिशील बनविणे हा या उपक्रमाचा हेतू असल्याचे सांगितले. निष्क्रिय, कामचुकार व भ्रष्ट पदाधिकाऱ्यांना बाजूला करून कार्यक्षम नेतृत्व पुढे आणणे, तसेच काँग्रेसची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर निरीक्षकांनी मार्गदर्शन करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्याची प्रक्रिया स्पष्ट केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे निरीक्षक प्रमोद कुमार जयंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आरीज बेग मिर्झा व डॉ. अरविंद कोलते तसेच जळगाव जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांनी अभियानाची रूपरेषा मांडली. व्यक्तीगत तसेच गटांच्या माध्यमातून मत जाणून घेण्याची पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमोद कुमार जयंत यांनी हिंदी भाषेत शेरो-शायरीसह केलेल्या भाषणाने उपस्थितांची दाद मिळवली.
त्यानंतर स्वतंत्र खोल्यांमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एका कक्षात जिल्हाध्यक्ष पदाबाबत मते जाणून घेण्यात आली, तर दुसऱ्या कक्षात तालुका अध्यक्ष पदासाठी इच्छुकांविषयी चर्चा करण्यात आली. ही प्रक्रिया सायंकाळी ४ वाजता सुरू होऊन रात्री ८ वाजेपर्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदासाठी अमळनेरमधील सुमारे ५ ते ६ इच्छुकांनी अर्ज सादर केले, तर तालुका अध्यक्ष पदासाठी ६ ते ८ कार्यकर्त्यांनी आपली उमेदवारी नोंदवली. एकूणच, मोठ्या संख्येने उपस्थितीत व शांततेत हा ‘संघटन सृजन अभियान’ कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांनी केले.

Leave a Reply