अक्षय तृतीय पार्श्वभूमीवर अमळनेरमध्ये बालविवाह प्रतिबंधासाठी पुरोहितांसह सतर्कता बैठक

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर पोलीस स्टेशन व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथील पुरोहित संघाची महत्त्वपूर्ण बैठक पंचायत समितीतील साने गुरुजी सभागृहात पार पडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर होणाऱ्या विवाहांच्या पार्श्वभूमीवर बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष सतर्कता अभियान राबविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. विवाह सोहळ्यांपूर्वी वधू-वरांचे वय काटेकोरपणे तपासावे तसेच आधार कार्ड, शाळेचा दाखला व जन्मदाखला पडताळूनच मुहूर्त सुचवावा, असे आवाहन धर्मगुरू व पुरोहितांना करण्यात आले.

यावेळी पोलीस स्टेशनच्या पीएसआय कविता ठाणगे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच पोस्को कायद्याची सविस्तर माहिती देत, बालविवाह घडवून आणणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा दिला. पोलीस कॉन्स्टेबल शामल पारधी यांचीही उपस्थिती होती.

आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संचालक रेणू प्रसाद यांनी बालविवाहासोबतच बालतस्करी, लैंगिक शोषण व बालकामगार या गंभीर मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद, जस्ट राईट फॉर चिल्ड्रन प्रकल्प समन्वयक आनंद पगारे, मोहिनी धनगर, दीपक विश्वेश्वर, उर्जिता शिसोदे, दीप्ती गायकवाड, अश्विनी भदाणे, भावना सूर्यवंशी तसेच पुरोहित संघाचे निलेश जोशी, श्रीकांत पाठक, हरिश्चंद्र जोशी, प्रफुल जोशी, अरविंद नाईक, अक्षय नाईक, ज्ञानेश्वर भावे, प्रदीप कुमार जोशी, प्रशांत जोशी, महेश कुलकर्णी, नंदकुमार जहांगीदार, सुनील जोशी, सारंग गर्गे, मंगेश काळकर आदी उपस्थित होते.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *