साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून बनवले शैक्षणिक साहित्य

अमळनेर (प्रतिनिधी) येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य बनवून, गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला. यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सर्वसाधारणपणे त्रिमित आकृत्यांची समज येण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत असतात. त्यातूनच त्यांच्यावर तयार होणारी सूत्रे विद्यार्थ्यांच्या बालमानावर गोंधळ निर्माण करतात व लक्षात ठेवण्यासाठी कठीण वाटू लागतात. त्यावर उपाय म्हणून विद्यालयातील गणित शिक्षक डी.ए.धनगर यांनी संस्था सचिव संदीप घोरपडे ध मुख्याध्यापक सुनील चुडामण पाटील यांच्या मार्गदर्शनाने वर्गात आवाहन केले की, घरातील टाकाऊ वस्तूंपासून विद्यार्थ्यांनी घन, इष्टिकाचिती व दंडगोल आकार बनवून आणा. त्यानुसार विद्यार्थ्यांनी स्वतःला आवडणारे त्रिमित आकार बनवून आणले. तदनंतर शिक्षकांनी सर्व वर्गाला या त्रिमित आकृत्यांवरून  उभे पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, घनफळ, वक्रपृष्ठफळ या संकल्पना व त्यावर आधारित सूत्रे समजावून सांगितली व बनवण्याची सोपी पद्धत सांगितली. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना समजले असेल त्यांनी वर्गात स्पष्टीकरण द्यावे असे सांगण्यात आले. त्यात वर्गातील दक्ष प्रकाश पाटील, नक्ष सचिन बोरसे, कौशल पंकज पाटील व अर्णव विवेकानंद पाटील या विद्यार्थ्यांनी इतर वर्गांवर जात स्पष्टीकरण व संकल्पना इतर विद्यार्थ्यांना समजावून दिल्या. आपल्यातीलच विद्यार्थी आपल्याला शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अधिक आवड निर्माण झाली. समाधानाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वकपणे सर्व संकल्पना समजून घेतल्या. एरवी अवघड वाटणारे सूत्र विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापनाने सोपे वाटू लागले. प्रत्यक्ष डोळ्यांनी बघत असताना संकल्पना अधिक दृढ झाल्या. पाठांतराशिवाय विद्यार्थी सूत्र बनवण्याची कला शिकले होते.  आता मात्र या विद्यार्थ्यांना स्वतः सूत्र बनवता येत असल्याने ते कधीही विसरणार नाहीत व पाठांतराची गरज सुद्धा भासणार नाही. त्यामुळे या उपक्रमाची अध्ययन निष्पत्ती चांगली होईल. आपल्याला गणित येत नाही ही कमीपणाची भावना आपोआप नष्ट झाली. तसेच आपल्यालाही सूत्र बनवता येते हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. धनगर यांनी राबवलेल्या या कृतीयुक्त आनंददायी उपक्रमाचे कौतुक संस्था अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी व पालकांनी कौतुक केले.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *