
वामननगरातील पाणीटंचाईवर महिलांचा नगरपालिकेत धडक मोर्चा
नवीन व्हॉल बसविण्याची किंवा पिंपळे रोड जलवाहिनीला जोडणी देण्याची मागणी; आठ दिवसांत प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोडवरील वामननगर परिसरात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून अपुरा व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिलांनी नगरपालिकेत जाऊन प्रशासनाकडे निवेदन सादर केले. परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन व्हॉल बसविण्यात यावा किंवा पिंपळे रोडच्या मुख्य जलवाहिनीला जोडणी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
निवेदनात म्हटले आहे की, वामननगरातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. दि. १२ जून रोजी करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्यादरम्यान नागरिकांना अवघा अर्धा तासच पाणी मिळाल्याचा आरोप महिलांनी केला. त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्यक पाण्याचीही कमतरता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही १२ मार्च २०२६ रोजी नागरिकांनी याच समस्येबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी व्हॉलमन, नगरसेवक, पाणीपुरवठा सभापती तसेच मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन वारंवार होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याशिवाय वेळोवेळी दूरध्वनीद्वारे तक्रारी करूनही प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे महिलांनी सांगितले. रविवारी सकाळी मोठ्या संख्येने महिला नगरपालिकेत दाखल झाल्या. मात्र, त्यावेळी मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती उपस्थित नसल्याने महिलांनी आपले निवेदन पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केले. परिसरातील पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महिलांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत सांगितले की, पुढील आठ दिवसांत वामननगर परिसरातील पाणीपुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात करण्यात आला नाही, तर नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्यामुळे आता नगरपालिकेचे प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते, याकडे वामननगरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply