अमळनेर तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपयांचे अनुदान मिळणार

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दरमहा २५०० रुपयांचे अनुदान सुरू करण्यात येणार असून संबंधित लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन तसेच कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी केले आहे.

तहसीलदार सुराणा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिव्यांग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दरमहा २५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुक्यातील दिव्यांग लाभार्थ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र, यूडीआयडी कार्ड, आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत संबंधित तलाठी कार्यालय किंवा तहसील कार्यालयात २० मार्चपर्यंत जमा करावी. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे यूडीआयडी प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांनी ते ई-सेवा केंद्रामार्फत तातडीने काढून घ्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर केल्यास पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २५०० रुपयांचे अनुदान सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दरम्यान, तहसीलदारांनी या संदर्भात गटविकास अधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी व ग्राम महसूल अधिकारी यांना सूचना देत संबंधित लाभार्थ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

Author photo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *